इंदुरीकर महाराजांचा गावात येण्यास नकार,ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन गाठलं वाचा पुढ काय ?
बीड तालुक्यातल्या कळसंबर गावात इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. गावकऱ्यांनी वर्गणी काढून एक ते दीड लाख रुपये जमवले होते. कीर्तनाच्या कार्यक्रमाची अगदी जय्यत तयारी झाली होती. भव्य मंडप घालण्यात आला होता. महिलांनी मोठ-मोठ्या रांगोळ्या घातल्या. भजनी मंडळही गावात आले होते. मात्र ऐनवेळी महाराजांनी गावात येऊ शकत नसल्याचं कळवलं. त्यामुळे अख्खं गाव संतापलं
बीडः बीड जिल्ल्हयातील (Beed District) कळसंबर येथे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांचं कीर्तन शुक्रवारी आयोजित करण्यात आलं होतं.
ग्रामस्थांनी यानिमित्त जय्यत तयारी केली होती. आयोजक आणि ग्रामस्थांनी त्यांना मानधन देखील पोचते केले होते. आजूबाजूच्या गावातील नागरिकही या कार्यक्रमासाठी जमले. मात्र ऐनवेळी महाराजांनी कीर्तनास (Kirtan) येण्यास नकार दिला. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. इंदुरीकर महाजारांनी आमची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गावकरी करू लागले. यासाठी रात्रीच्या सुमारास अख्खा गाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. अखेर गावकऱ्यांनी तसेच स्थानिक कीर्तनकारांनी मध्यस्थी केल्यानंतर गावकऱ्यांचा राग शांत झाला.
नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले इंदुरीकर महाराज यावेळी वेगळ्याच कारणात अडकले. बीडमधील ग्रामस्थांनी महाराज येणार नसल्याचं कळताच नेकनूर पोलिस स्टेशन गाठलं. तब्बल दोन तास ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मात्र काही स्थानिक किर्तनकारांनी समजूत काढल्यानंतर ग्रामस्थ तक्रार न देताच परतले. यामुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरील संकट तूर्तास तरी टळले आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रम रद्द
इंदुरीकर महाराज यांना मे महिन्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यावेळीदेखील त्यांनी पत्र लिहून विविध ठिकाणच्या आयोजकांसमोर सविस्तर भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. मात्र बीडमधील कार्यक्रमापूर्वी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती देण्यात आली. गावकरी तर एवढे हट्टाला पेटले होते की, महाराजांनी गावात यावं, आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेतो, असे म्हटलं. तरीही इंदुरीकर महाराजांनी गावात येण्यास नकार दिला.