भगरीच्या भाकरी खाण्याने सहा जणांना विषबाधा
बीड : भगरीच्या भाकरी खाण्याने सहा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार तालुक्यातील मेंगडेवाडी येथे गुरुवारी घडला. उलटी, मळमळीचा त्रास झालेल्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.
मेंगडेवाडी येथे सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. गुरूवारी उपवासानिमित्त भगर आणली होती. सर्व भाविकांना भात तयार करून देण्यात आला होता. परंतु मुख्य महाराजांसोबत असलेले भजनी, वादक, गायक यांनी भाकरी करण्यास सांगितले. ज्या सहा लोकांनी भाकरी खाल्ल्या, त्यांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला.
यानंतर चऱ्हाटा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तांदळे, डॉ. बांगर, डॉ. मदन काकड, किशोर जाधव, रोहित घोगरे, अमोल गायकवाड यांनी गावात भेट देऊन माहिती घेतली. चऱ्हाटा केंद्रात प्राथमिक उपचार करून सर्वांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.