बस ३५ प्रवासी घेऊन रॉंगसाईटने ट्रकला धडकली
आष्टी: चांगतपुरी येथून परतूरकडे ३५ प्रवासी घेऊन रॉंगसाईटने जाणारी बस ट्रकला धडकल्याची घटना परतूर तालुक्यातील आष्टी येथील वसंतराव नाईक चौकात मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी चांगतपुरीहून ३५ ते ४० प्रवासी घेऊन बस परतूरकडे जात होती. आष्टी शहरातील वसंतराव नाईक चौकात चालकाने बस रॉंगसाईडने टाकली. त्याचवेळी परतूरहून आष्टीकडे जाणाऱ्या ट्रकला बस धडकली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात ट्रक व बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसचालक सत्यनारायण हरिभाऊ खरात ( वय ५४), गोदावरी पंडितराव सवने (५० रा. चांगतपुरी ), मीना ख्वाजा कुरेशी (३२ रा. मेहकर) यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. हारूण शेख यांनी प्रथमोपचार केले.
घटनेची माहिती मिळताच, आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी ट्रकचालक अंकुशकुमार गुप्ता (२२ रा. जमुआ ता. मझोली, जि. सिंधी मध्यप्रदेश) याच्या फिर्यादीवरून बस चालक सत्यनारायण हरिभाऊ खरात याच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार आर. आर. गौड हे करीत आहेत.