भाऊबीजेच्या दिवशी येथे बहिणी भावाला मृत्यूचा श्राप देतात
भारतात आता वेगवेगळ्या सणांचा आणि उत्सवांचा सीझन सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणातून भाऊ-बहिणीचं पवित्र नातं दिसतं.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याला तिची सुरक्षा करण्याचं वचन मागते. सोबतच बहिणी देवाकडे आपल्या भावांना सुख-समृद्धी मिळावी अशी मागणीही करतात.
रक्षाबंधनासोबतच भाऊबीजेलाही बहिणी भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण भारतात एक असंही राज्य आहे जिथे बहिणी भावाला मृत्यूचा श्राप देतात. हे वाचल्यावर अर्थातच कुणीही हैराण होईल. पण हे सत्य आहे. भावांना श्राप दिल्यानंतर बहिणी त्यासाठी पश्चातापही करतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून इथे चालत आली आहे. चला जाणून घेऊन काय आहे ही परंपरा आणि कुठे पाळली जाते.
ही अजब परंपरा छत्तीसगढ राज्यात बघायला मिळते. जशपूर जिल्ह्यातील एका विेशेष समाजाचे लोक याचं पालन करतात. या समाजातील मुली आपल्या भावांना मरण्याचा श्राप देतात आणि असं भाऊबीजेच्या दिवशी केलं जातं. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी सकाळी झोपेतून उठल्यावर भावांना श्राप देतात. याचं प्रायश्चित करण्यासाठी बहिणी त्यांच्या जिभेत काटा टोचतात.
त्यानंतर जशपूर जिल्ह्यातील विशेष समाजातील मुली भावांच्या कपाळावर टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात. वर्षानुवर्षे या परंपरेचं पालन केलं जात आहे.
पौराणिक मान्यतांनुसार, यम एकदा पृथ्वीवर अशा व्यक्तीला मारण्यासाठी आला होता ज्याच्या बहिणीने त्याला कधीच कोणता श्राप दिला नसेल. यमाने बराच शोध घेतल्यानंतर त्याला एक अशी व्यक्ती सापडली ज्याच्या बहिणीने त्याला कधीच श्राप दिला नाही. ती तिच्या भावावर खूप प्रेम करत होती. यमाच्या या योजनेची माहिती या व्यक्तीच्या बहिणीला मिळते की, यम तिच्या भावाचा प्राण घेणार आहे.
हे समजल्यावर बहीण आपल्या भावाला शिवी देते आणि श्राप देते. ज्यामुळे यम तिच्या भावाचा प्राण घेऊ शकत नाही. याने एका व्यक्तीचा जीव वाचतो. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे