रुग्ण बनून रुग्णालयात गेले; अवस्था पाहून संतापलेल्या सीईओंची थेट कारवाई…

तब्येत बरी नाही म्हणनू दाखवायला आलोय. पण, डॉक्टर साहेब अजून कोठे आले नाहीत. कर्मचारीही वेळेत आलेले नाहीत. तुम्ही किती वेळ बसला आहात. आरोग्य अधिकाऱ्यांना दररोज असाच वेळ होता का?, अशी दीड ते दोन तास रुग्णांची विचारपूस करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.
यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उशिरा येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले.
स्वत: रुग्ण असल्याचे दाखवून हसूर (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेलेल्या कार्तिकेयन एस. यांना एक-दोन कर्मचारी सोडले तर इतर सर्व जण उशिरा आल्याचे दिसले. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत कामावर हजर राहावे, अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही आरोग्य अधिकारी लोकांना ताटकळत बसवून उशिरा येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आज सकाळी अंगात टी-शर्ट व तोंडाला मास्क घालून हसूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण म्हणूनच गेले. त्याआधी त्यांनी त्यांच्या अंगरक्षकाला केस पेपर काढण्यास सांगितले.
सकाळी साडेआठपासून कामाची वेळ सुरू होत असतानाही यावेळी आरोग्य केंद्रात अधिकारी आले नव्हते. पण, ग्रामीण भागातील रुग्ण त्यांची वाट पाहत बसले होते. त्याठिकाणी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळेही बसून आलेल्या रुग्णांशी चर्चा करू लागले. डॉक्टर कधी येतात या कार्तिकेयन एस. यांच्या प्रश्नावर वेळेत येत नाहीत. आम्हाला तासंतास ताटकळत बसावे लागते. कर्मचारीही त्यांच्या वेळेनुसार येतात. त्यामुळे ऐन थंडीत कुडकुडत बसावे लागते, अशा तक्रारी आणि उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना पाहून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य केंद्रातील औषधांचा साठा, रजिस्टर, नोंदी, स्वच्छता आणि बायोमेट्रिक उपस्थिती यांची प्रत्यक्ष तपासणी केली.
कार्तिकेयन एस. म्हणाले, आरोग्य अधिकाऱ्यांनी सकाळी ८.३० वाजता वेळेवर येणे बंधनकारक आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून सेवा देणे आवश्यक आहे. लोकांची एकही तक्रार येऊ नये, असे काम केले पाहिजे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा पद्धतीने अचानक भेटी देऊन आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.











