वादग्रस्त वक्तव्य ,काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना नारळ द्या
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा व्हीडिओ ट्विट करत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.”