धार्मिक

मनुस्मृतीतील कोणत्या श्लोकावरून सुरु आहे वाद ? त्याचा अर्थ काय ? जाणून घ्या सर्वकाही


राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले.



त्यानंतर, मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडण्यात आले. त्यानंतर, विरोधकांनी आव्हाड यांच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या असून आव्हाड यांच्या अटकेचीही मागणी केली जात आहे.

या श्लोकावरून वाद 

भारताच्या प्राचीन साहित्य, संस्कृती व ज्ञान परंपरेची विद्यार्थांना माहिती व्हावी या उद्देशाने व नवीन शैक्षणिक धोरणातील निर्देशानुसार शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश करण्याचा प्रस्ताव एससीईआरटी ने मांडला आहे. त्यावर सूचनाही मागवल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडे तब्बल 1500 सूचना आणि आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

 

श्लोक – अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन: | त्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्याशोबलम|| (संदर्भ: मनुस्मृती)

 

अर्थ – ज्येष्ठ नागरिक, पालक शिक्षक यांची सेवा व आदर केल्यास आयुष्यात विद्या, यश आणि बळ वाढते… अशी शिकवण या संस्कृत श्लोकातून मिळते. अगदी त्याचप्रमाणे प्राचीन संस्कृती व सभ्यता यांचा मेळ म्हणजे मूल्य व स्वभाववृद्धी होय. असा मजकूर मनुस्मृतीमधील श्लोकाखाली आहे.

दरम्यान, याच मनुस्मृतीतील श्लोकाविरोधात काॅंग्रेसचे नाना पटोले व वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे शरद पवार , जितेंद्र आव्हाड, यांच्यासह सत्ताधारी अजित पवार गटानेही विरोध केला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मात्र या श्लोकाचे समर्थन केले आहे. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात हा श्लोक शिकवला जातो असा दावाही केसरकर यांनी केला आहे.

केसरकर म्हणाले, मनुस्मृती ग्रंथावर लोकांचा आक्षेप असला तरी प्रत्यक्षात हा श्लोक आक्षेपार्ह नसून अतिशय चांगला आहे. त्या ग्रंथातील काही भागांवर लोकांचे आक्षेप आहेत. आम्ही त्या आक्षेपार्ह मजकुराचे समर्थन करत नाही की प्रचारही करत नाही. फक्त ज्यात काहीही चूक नाही त्या श्लोकाचा समावेश करण्याचा विचार आहे.

विरोध का होतोय 

मनुस्मृती हा सनातनवादी हिंदू ग्रंथ मानला जातो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचा तीव्र निषेध करत 25 डिसेंबर 1927 रोजी दहन केले होते. तेव्हापासून मागासवर्गीय समाजात या ग्रंथाविरोधात तीव्र भावना आहेत. म्हणून विरोध. उद्या इतर धर्मातील साहित्याचाही अभ्यासक्रमात समावेशाची मागणी वाढेल, अशी भीती काहींना वाटते.

आव्हाडांनी मागितली माफी

मनुस्मृती दहन करण्याकरिता आम्ही महाड येथे आलो, तेव्हा मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडत असताना, त्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षातच आलं नाही. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले, यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू यात नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दामुन केलं नाही.

आमच्या विरोधकांना काय राजकारण करायचं आहे, ते करतील ते खूप काही मागणी करतील. पण, त्यावर मी अधिक काही बोलणार नाही, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिलं आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोपावरही आव्हाड यांनी प्रत्त्युत्तर दिलं. माझा स्टंट आहे की नाही ते जाऊ द्या. पण, मनुच्या पुस्तकावर मिटकरी यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी सांगावं, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button