महत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

नाशिकला उतरताच मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची हेलिपॅडवरच तपासणी, निवडणूक आयोगाला काय काय आढळलं?


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी नेतेमंडळी हेलिकॉप्टरने प्रवास करत आहेत. तसंच, काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला.

एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे नेल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावरून राज्यभरात बराच गदारोळ झाला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर लँड होताच त्यांची बॅग आज तपासण्यात आली.

‘नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे’, असा आरोप करत संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओत हेलिकॉप्टरमधून काही बॅगाही बाहेर काढत असल्याचं दिसत होतं. यावरून राज्यभरात बराच गदारोळ झाला. या बॅगांमध्ये कपडे होते, असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला. परंतु, संजय राऊत आपल्या दाव्यावर ठाम होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे आजही नाशिक दौऱ्यावर आहेत. आज एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर निलगिरी हेलिपॅडवर लॅण्ड झालं. हेलिकॉप्टर लॅण्ड होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. या बॅगांमध्ये कपडे, औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आढळल्या आहेत.

दरम्यान, नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदरात पाडून घेतली आहे. महायुतीत ही जागा कोणाकडे जाईल यावर बरेच दिवस खलबते झाली. अजित पवार गटाकडून या जागेवरून छगन भुजबळांचं नाव चर्चेत होते. खुद्द मोदींनीच याच नावाची शिफारस केली होती, असंही भुजबळांनी सांगितलं होतं. परंतु, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने प्रचाराला वेळ मिळणार नाही, असं सांगत छगन भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी एकनाथ शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या जागेवर हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे.

शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात कडवी लढत

ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे प्रथमच लोकसभेसाठी उमेदवारी करीत असल्याने विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी फारसे मुद्दे नसल्याने वाजे यांना लाभ होत आहे. वादरहित आणि संयमी नेतृत्व म्हणून वाजे यांच्याकडे पाहिले जाते. दुसरीकडे, उमेदवारी मिळविण्यासाठी झालेली दमछाक गोडसे यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. त्यांच्यासाठी आता रात्र थोडी सोंगे फार, अशी स्थिती आहे. गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात नकारात्मक वातावरण असल्याचे पाहणीत आढळून आल्याचा दावा करणाऱ्या भाजपचा काहीसा अलिप्तपणा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि आमदार माणिक कोकाटे यांचे सुरक्षित अंतर राखणे, यामुळे नाशिकची जागा धोक्यात आल्याचे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दोनवेळा नाशिक गाठून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधावा लागला. गोडसे यांनी २००९ मध्ये आपली लोकसभेची पहिली निवडणूक मनसेकडून लढवली होती. मनसेशी असलेले जूने नाते लक्षात घेऊन मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button