प्रचंड नरसंहार,गोळ्या खर्च होऊ नये म्हणून कुऱ्हाडीने कापलं, तब्बल 20 लाख जणांना मारलं
मंदिरांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेला कंबोडिया हा आग्नेय आशियातला एक लहानसा देश आहे. कधी शेजारी-पाजाऱ्यांचा जाच, कधी वसाहतवादी युरोपीयनांचा जाच तर, कधी देशांतर्गत संघर्ष अशा कितीतरी संकटांतून सावरत हा देश उभा आहे; मात्र 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या देशानं प्रचंड नरसंहार पाहिला आहे.
1975 ते 1979 मधल्या मार्क्सवादी हुकूमशाहीच्या सत्तेने अवघ्या चार वर्षांच्या काळात या देशातल्या लाखो जणांची कत्तल केली होती. पाच लाख मुस्लिम आणि 20 हजार व्हिएतनामींसह 15 ते 20 लाख जणांची कत्तल करण्यात आली होती. आता तब्बल 47 वर्षांनंतर या प्रकरणातील शेवटच्या खुन्याला शिक्षा मिळाली आहे. 91 वर्षांचा ख्मेर रूज नेता खीयू सम्फान याला न्यायालयाने नरसंहारासाठी दोषी ठरवलं आहे. त्याला आजन्म तुरुंगावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
खीयू सम्फान हा कंबोडियातला शेवटचा ख्मेर रूज नेता आहे. त्याच्या एका आदेशावर संपूर्ण शहराचं स्मशानात रुपांतर झालं होते. जे जिवंत होते त्यांचाही अतोनात छळ करण्यात आला. ख्मेर रूज राजवटीच्या अवघ्या तीन वर्षांत कंबोडियातली 25 टक्के लोकसंख्या मारली गेली होती.
कंबोडियामध्ये यूएन-समर्थित ट्रिब्युनल कोर्ट ऑफ कंबोडियाने (ईसीसीसी) ख्मेर रूज राजवटीच्या शेवटच्या नेत्याला नरसंहारासाठी दोषी ठरवलं आहे आणि त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. कम्युनिस्ट नेता पॉल पॉटच्या नेतृत्वाखालील ख्मेर रूज ही कंबोडियातली सर्वांत क्रूर राजवट मानली जातो. 91 वर्षांचा खीयू सम्फान हा या राजवटीतला शेवटचा जिवंत नेता आहे. तो कंबोडियाचा राष्ट्राध्यक्षदेखील होता. त्याने आपल्या शिक्षेविरुद्ध अपील केलं होतं. 2018मध्ये तो मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
17 एप्रिल 1975 ते 7 जानेवारी 1979 पर्यंत म्हणजे फक्त तीन वर्षं आठ महिने आणि 20 दिवस ख्मेर रूज राजवट सत्तेत होती. या तीन वर्षांच्या राजवटीत कंबोडियात रक्ताच्या नद्या वाहत होत्या. चीनच्या कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली असलेल्या पंतप्रधान पॉल पॉटने मुस्लिम, इतर जमातींचे लोक आणि बौद्ध धर्माच्या अनुयायी असलेल्या लाखो जणांना ठार केलं. त्यांना उपाशी ठेवून त्यांचा छळ करण्यात आला होता.
स्थलांतराच्या नावाखाली इतर जाती-धर्मांच्या हजारो लोकांना जमा करून त्यांना मृत्युदंड देण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्याकांड करण्यात गोळ्या वाया जाऊ नयेत म्हणून या लोकांचे कुऱ्हाडीने अक्षरश: तुकडे करण्यात आले होते.