पंकजा मुंडे यांचा थेट सवाल,मी काय पाकिस्तान, बांगलादेशातून आलीय का?
बीड : भाजपाच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत आपल्या मनातील खंत व्यक्त केली. त्यांच्या विरोधातील ट्रोलिंग करणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले. आपल्यावर हातापाया पडून मतदान मागण्याची वेळ आलेली नाही.
लोकशाहीमध्ये नम्रपणे मतदान मागितले जाते. पण आपल्यावर ही वेळ आली असे आपल्या सहकाऱ्यांना वाटत आहे. लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे. माझ्यामध्ये अवगुण आहे का ? काही खोट आहे का ? मी कोणाला त्रास दिला आहे का ? तुमचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजा आणि मला मत करा. मी काय पाकिस्तान, बांगलादेशातून आलीय का ? असा थेट सवालच पंकजा मुंडे यांनी यावेळी केला. आपली निवडणूक राष्ट्रीय स्तरावरुन पुन्हा लोकल पातळीवरच म्हणजे बीडमध्येच आली आहे. परळीत आमदार म्हणून मी सुरुवात केली, ग्रामीण भागात सर्वात जास्त शौचालये माझ्या कारकीर्दीत झाल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पाटोदा येथील सभेत त्यांच्यावरील समाजमाध्यमांवर सुरु असलेल्या ट्रोलींग विरोधात जोरदार टीका केली आहे. आपण बीडच्या जिल्ह्यासाठी एखादी गृहीणी आपला संसार करते तसे आपण हा जिल्ह्याचा संसार सावरला. आपल्यात काही खोट आहे का ? बीड जिल्ह्यातील आपले काम केले आहे. बँकेत कर्ज घेताना जसे रेकॉर्ड तपासले जाते तसेच माझेही रेकॉर्ड तपासले पाहिजे असे म्हटले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक शौचालये बांधण्याचा रेकॉर्ड झाला आहे. प्रचंड दुष्काळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मी पीक विमा दिला असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. 992 कोटीचा विमा मंजूर करुन दिला. परंतू निवडणूक लागली की मते हडपायला येतात अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.
मुस्लीमांना घाबरण्याची काय गरज ?
मी इतकी वर्षे काम केली. परंतू गेली पाच वर्षे मला लोकप्रतिनिधी म्हणून कोणतेही पद नव्हते. तो माझा दोष आहे का ? मी पक्षाचे काम करीतच होते. मला अठरापगड जातीची माणसं येऊन भेटत आहेत. मराठा समाजाच्या अनेक संघटना आणि कार्यकर्ते मला पाठिंबा देत आहेत. आमची बैठक घ्या म्हणून मागे लागत आहेत. मुस्लीमांना काही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काय बांग्लादेशातून आलात काय? की पाकिस्तानातून ? मुस्लीमांना योजनांचे लाभ देऊ नका असे मोदी म्हणाले आहेत का? मुस्लिम बांधव हे देशाचे नागरिक आहेत. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. संविधान बदलणार आहेत असा आरोप केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोणीही बदलणार नाही. एक चहा विकणारा व्यक्ती संविधानामुळे पंतप्रधान झाला. तुम्ही मला मतदान दिले तर मी विकासाच्या माध्यमांतून त्याची परतफेड करेन असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मग ट्रोल कशासाठी करता?
मी कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही व्यासपीठावर शिव्या दिल्या नाहीत. मी आरक्षण रोखलेले नाही, आरक्षणाला माझा विरोधही नाही, मग माझ्यावर कसली नाराजी आहे. आरक्षणाच्या लढाईत आम्ही सर्व सोबत आहोत. शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण हवंय असे म्हणत पंकजा मुंडे यांनी सभेला आलेल्या मराठा तरुणाला यावेळी सवाल केला. ओबीसीतून सर्टीफिकेट पाहिजे मग मी वेगळी कशी ? मग आपण आपले बघा ही चर्चा कशासाठी? मी कोणाचं काय वाईट केलं आहे, मग अडलंय कुठं, मी कोणाचं घोडं मारलं आहे? आपण सर्व एक आहोत, तुमचं आणि माझं रक्त एकच आहे, असे काही करु नकारे असे आवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केले. जातीसाठी माती नका खाऊ? मातीसाठी जातीव्यवस्था संपुष्टात आणा. मी मत विकासासाठीमागत आहे. तरुणाईचे भविष्य बदलण्यासाठी मी मत मागत आहे. मी पाकिस्तान , बांगलादेश म्हणून आले का ? मी बीडचीच आहे ना ? मग ट्रोल कशासाठी करता? आजपासून तुमचा सोशल मीडिया काही दिवसासाठी बंद करा असेही आवाहन मुंडे यांनी केले.