मृत्यू कसा झाला?एकाच रूममध्ये तिघेही संपले, अघोरी जादू की प्रेमाचा त्रिकोण?
व्रत्तसंस्था : अरुणाचल प्रदेशात एका हॉटेलमध्ये तिघांचा गूढरीत्या मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन महिला आहेत. ही माणसं नेमकी कोण आहेत, एकाच ठिकाणी यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपास सध्या सुरू आहे.
मंगळवारी (2 एप्रिल) ही घटना घडली आहे. या संदर्भात `झी न्यूज`ने वृत्त दिलं आहे.
अरुणाचल प्रदेशात सुबनसिरी जिल्ह्यात जिरो इथं एका हॉटेलमध्ये तिघांचा मंगळवारी गूढरीत्या मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हॉटेलच्या परिसरात घटनेचं वृत्त समजताच खळबळ उडाली आहे. आता स्थानिक पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे. नवीन थॉमस (वय 39, रा. कोट्टायम, केरळ) मागच्या आठवड्यात 28 मार्च रोजी पत्नी देवी बी (रा. तिरुअनंतपुरम) आणि मैत्रीण आर्या बी. नायर यांच्यासह हॉटेलमध्ये राहिले होते. नवीन ऑनलाइन ट्रेडिंगचं काम करायचे, तर त्यांची पत्नी देवी ही शाळेत जर्मन भाषेची शिक्षिका होती. आर्यासुद्धा त्याच शाळेत फ्रेंच शिक्षिका होती.
खोलीचं दार तोड्ल्यावर भयाण चित्र
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं, की हॉटेलच्या आवारात कोणीही या तिघांना सोमवारपासून पाहिलेलं नव्हतं. हॉटेलमध्ये दाखल झाल्यापासूनचं त्यांचं बिलसुद्धा भरलेलं नव्हतं. त्या तिघांबाबत शंका येऊ लागली. मंगळवारी सकाळी काहीतरी गैरप्रकार असल्याची शंका आल्यानं खोली तपासण्यासाठी कर्मचारी आले; पण खोली आतल्या बाजूनं बंद होती. तेव्हा कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडला, तर आतमध्ये तिघंही मृतावस्थेत आढळले.
आर्या नायर हिचा मृतदेह बेडवर होता आणि ब्लेडच्या साह्याने तिच्या हाताची नस कापलेली होती. तर देवी हिचा मृतदेह फरशीवर पडलेला होता, तिच्या मानेवर आणि मनगटाच्या उजव्या बाजूला कापल्याच्या खुणा होत्या. थॉमसचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला आणि त्याच्या डाव्या मनगटावर जखमेच्या खुणा होत्या.
खोलीचं रहस्य : हत्या की आत्महत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळपर्यंत तिघांचेही शवविच्छेदन अहवाल येणार आहेत. या घटनेशी संबंधित सगळ्या पैलूंचा विचार करून पोलिसांचा तपास चालू आहे. तपासासाठी आवश्यक असणारे अन्य पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांची टीम करत आहे. फॉरेन्सिक टीमकडून तपासासाठी काही धागा मिळू शकतो का, याची अपेक्षा पोलिसांना आहे. आर्या नायर बेपत्ता असल्याची तक्रार तिरुअनंतपुरम इथं दाखल करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
चर्चा काळ्या जादूची..
केरळ पोलिसांचं असं म्हणणं आहे की, एकाच राज्यातल्या तिघांची अन्य राज्यात म्हणजे, अरुणाचल इथं हत्या होते, या प्रकरणाच्या तपासासाठी एक टीम पाठवण्यात येणार आहे. या तिघांच्या मृत्यूमागे काळी जादू केली गेली आहे, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तर या तिघांच्या परिचितांपैकी काही जण या गूढ हत्यांमागे विवाहबाह्य नात्याचं लेबलही लावत आहेत.