बिहारमधील सीमांचल क्षेत्रामध्ये ५०० हून अधिक शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुटी !
पाटलीपुत्र (बिहार) : झारखंडनंतर आता बिहारमधील सीमांचल क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून ५०० हून अधिक शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुटी दिली जात आहे.
शाळा किशनगंज, अररिया, कटिहार आणि पूर्णिया या जिल्ह्यांतील मुसलमानबहुल भागांत आहेत. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार सीमांचल क्षेत्रामध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे.
१. अररिया जिल्ह्यातील जोकीहाट ब्लॉकमधील २४४ सरकारी शाळांपैकी २२९ शाळांना शुक्रवारी सुटी असते. जोकीहाट ब्लॉक शिक्षण अधिकारी शिव नारायण सुमन यांनी याला दुजोरा दिला आहे. अनेक वर्षांपासून ही परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.
२. अररिया जिल्हा शिक्षण अधिकारी राज कुमार यांनी सांगितले की, या संदर्भात कोणताही सरकारी आदेश नाही.
३. एका सरकारी शाळेतील शिक्षकाने सांगितले की, वर्ष २०१४ मध्ये संयुक्त जनता दलाचे नेते महमूद असरफ यांनी पूर्णिया जिल्ह्यातील बैसी ब्लॉकमधील मीनापूर पंचायतमधील सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुटी देण्यास बाध्य केले होते. शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी याला कधीही विरोध केला नाही.
४. बलरामपूर ब्लॉकच्या शिक्षण अधिकारी मुमताज अहमद यांनी सांगितले की, या संदर्भात बिहार सरकारने वर्ष २०१० मध्ये पत्र लिहिले होते आणि तेव्हापासून शुक्रवारची सुटी देण्यात येऊ लागली.
.तर हिंदूंना मंगळवारी सुटी द्या ! – भाजप
भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी शुक्रवारी सुटी देण्यास विरोध केला आहे. जर मुसलमानांसाठी शुक्रवारी शाळा बंद ठेवण्यात येत असतील, तर हिंदूंसाठी त्या मंगळवारी बंद ठेवल्या पाहिजेत. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून राज्यघटनेनुसार कोणत्याही धर्मानुसार नियम बनवण्याची आवश्यकता नाही.