‘मी जर दहा टक्के आरक्षण स्विकारलं नाही तर मी वाईट, आणि मी जर आरक्षण स्विकारलं तर ते माझे मुके देखील घेतील’ – जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर : राज्य स ।रकारनं मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. मात्र तरी देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि सगे सोयरे शब्दाची अंमबजावणी करावी या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे. अधिवेशनामध्ये एकमतानं दहा टक्के आरक्षणाला मंजुरी देण्यात आली, मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर ठाम आहेत. सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा एक नवी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, आम्ही दहा टक्के आरक्षण घेण्यास तयार आहोत, मात्र ते आरक्षण आम्हाला ओबीसीमधून द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेमंक काय म्हणाले जरांगे पाटील?
‘जे आरक्षण टिकणार नाही ते आरक्षण घ्या म्हणत आहेत. मात्र ओबीसीमधून आरक्षण ही आमची मुळ मागणी आहे. हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही. तुम्ही जर आम्हाला ओबीसीमधून दहा टक्के आरक्षण दिलं तर ते आम्ही स्विकारू’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मी जर दहा टक्के आरक्षण स्विकारलं नाही तर मी वाईट, आणि मी जर आरक्षण स्विकारलं तर ते माझे मुके देखील घेतील’ असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान एसआयटी चौकशीवरून देखील त्यांनी हल्लाबोल केला आहे. माझी एसआयटी चौकशी लावण्यापूर्वी तुमच्यासोबत जे फिरत आहेत, त्यांनी अख्खा महाराष्ट्र खाल्ला आहे, त्यांची आधी चौकशी लावा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.