100 कोटी रुपयांत राज्यसभेची उमेदवारी
100 कोटी रुपयांत राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्याचे आणि राज्यपालपदी नियुक्तीचे आमिष दाखवणाऱया रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. रॅकेटमधील चौघा ठगांना सीबीआयने अटक केली असून त्यांच्या चौकशीतून इतर अनेक आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
आरोपींनी पैसे उकळण्याआधीच सीबीआयने त्यांच्या अटकेची कारवाई केली.
सीबीआयच्या अधिकाऱयांनी सोमवारी या कारवाईची माहिती दिली. तपास यंत्रणेने मागील काही दिवसांत महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील सात ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान मोहम्मद एजाज खान नावाच्या एका आरोपीने सीबीआयच्या अधिकाऱयांवर हल्ला केला व तो फरार झाला. हल्ला केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सीबीआयने लातूर जिह्यातील कमलाकर प्रेमकुमार बांदगर, बेळगावमधून रवींद्र विठ्ठल नाईक, दिल्ली-एनसीआरचा रहिवाशी महेंद्र पाल अरोरा आणि अभिषेक बुरा या आरोपींना अटक केली आहे. राज्यसभेची उमेदवारी, राज्यपालपदी नियुक्ती, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संस्थांवरील अध्यक्षपदी नियुक्ती आदी आमिषे दाखवून आरोपींनी कोटय़वधी रुपये लाटण्याचा कट रचला होता, अशी माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. दरम्यान, चारही आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.