“मनोज जरांगेंना अटक करा”, जरांगेंची पत्रकार परिषद ही धमकीवजा..
मुंबई : पोलिसांनी मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच मनोज जरांगेंची पत्रकार परिषद ही धमकीवजा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बबनराव तायवाडेंनी माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंच्या अटकेची मागणी केली.
बबनराव तायवाडे म्हणाले की, “मनोज जरांगेंची पत्रकार परिषद ही धमकीवजा होती. आम्हाला जे विरोध करतील त्यांना टपकून टाकू किंवा त्यांची वंशावळ राहणार नाही, असे ते म्हणाले. ही कसली भाषा आहे? आपल्या महाराष्ट्राची ही सभ्यता आहे का? त्यामुळे मी सरकारला आणि पोलिसांना विनंती करतो की, अशी भाषा वापरणाऱ्या माणसाच्या विरोधात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी. ते सामुहिकरित्या धमकी देत आहेत.”
“छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे आणि आम्ही सगळे आमच्या समाजाच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आमच्या समाजासोबत आहोत. ते जसं त्यांच्या समाजासाठी झटत आहेत, तसंच आम्ही आमच्या समाजासाठी झटत आहोत. हा काही गुन्हा नाही. परंतू, आमची खानदान, वंशावळ संपवण्याची भाषा जर ते करत असतील तर सरकारने यावर त्वरित अॅक्शन घ्यावी. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी आणि जेलमध्ये टाकावं. अन्यथा संपुर्ण ओबीसी त्यांच्याविरोधात उभा राहिल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, “ओबीसी, एससी आणि एसटीला मिळणाऱ्या ५० टक्क्यांहून अधिकचे आरक्षण जर मराठा समाजाला देण्यात येत असेल तर त्याला आमचा कधीही विरोध राहणार नाही. परंतू, ज्यादिवशी या ५० टक्क्यांमधूनच आरक्षण देण्याचा विचार सरकार करत असेल त्यादिवशी महाराष्ट्रातील एससी, एसटी, ओबीसी एकत्र येऊन याचा विरोध करेल. आजही आम्ही मराठा आरक्षाच्या विरोधात नाही. पण आम्हाला मिळतं त्यातून नव्हे तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारने दिलं तर आमचा याला आक्षेप नसेल,” असेही ते म्हणाले.