‘सगेसोयऱ्यां’साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, प्रकृती खालावली; सरकारला दिला इशारा; म्हणाले…
अंतरवली : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवलीत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकतीही खालावली आहे. तसेच उपचार घ्यायला त्यांनी नकार दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, “15 तारखेला अधिवेशन घेतलं नाही, तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅझेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय त्यांच्या लक्षात येणार नाही. त्यांनी टप्पे पाडलेत तर मग आम्ही पण टप्पे पाडलेलेच आहेत ना आंदोलनाचे. आम्ही काय दाखवू हे सरकारला चांगलचं माहिती आहे. १५ तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर मराठे पुन्हा मुंबईला जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही, त्यांना लवकरच कळेल”
१५ तारखेला अमित शहा संभाजीनगरला येत आहेत. पण आम्ही कशासाठी त्यांची भेट घ्यायची त्यांनी येऊन आमची भेट घ्यावी. त्यांना आम्ही यापूर्वी खूप विनंती केल्या आहेत. त्यांनी लक्ष दिलेलं नाही मग ते कोणीही असू द्या. त्यांना परत हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहोत. आता आम्ही १४ राज्यात एकत्र यायला लागलो आहोत. मग त्यांना दाखवतो कचका काय असतो. यानंतर आता देशात आंदोलन होईल, कारण आम्ही चौदा राज्यात एकत्र येत आहोत, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.