शेळीनं दिला माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म; पाहून मालक हैराण
निसर्गाची अनेक अनोखी रूपे पाहून जगातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. असाच काहीचा प्रकार इंदूरमध्ये पाहायला मिळाला आहे, जिथे बुधवारी एका शेळीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला, जे पाहून तिचा मालकही हैराण झाला.
या पिल्लाला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली. शेळीच्या मालकाने याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यावेळी डॉक्टरांनी शेळीच्या पिल्लाचे माणसासारखे दिसण्यामागे नेमके कोणते कारण आहे? हे सांगितले आहे.
इंदूरच्या चंदन नगर भागात हा प्रकार घडला. मोहसीन नावाच्या व्यक्तीच्या घरी बुधवारी भुरी नावाच्या शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी एक पिल्लू माणसासारखे दिसत होते. ततर,दुसऱ्या पिल्लाची प्रकृती उत्तम आहे. भुरी ही माळवी जातीची शेळी आहे. तिने जन्म दिलेल्या दोन पिल्लापैकी एकाचे डोळे मध्यभागी आहेत. म्हणजेच माणसासारखे आहेत. हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी भुरी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली. हा निसर्गाचा चमत्कार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“शेळीच्या पिल्लाला जन्मताच मानवासारखे डोळे असणे हा एक आजाराचा भाग आहे, ज्याला हेड डिस्पेप्सिया’ असे म्हणतात. डॉक्टरांच्या मते ५० हजारांपैकी एखाद्या जनावराला हा आजार जडतो. हा आजार सहसा गायी किंवा मेंढ्यामध्ये अधिक पाहायला मिळतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांचे डोके फुगल्याचेही प्रकार समोर आले आहेत. या आजारामुळे गरोदरपणात जनावरांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असते. याचबरोबर गरोदरपणात जनावरांना चुकीचे औषध दिल्यानेही अशा प्रकारचे पिल्ले जन्माला येण्याची शक्यता असते”, असे डॉक्टरांनी सांगितले.
यापूर्वी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात कुठौंद येथेही एका शेळीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला होता. या पिल्ल्याचे हात- पाय शेळीसारखेच होते. मात्र, त्याच्या शरिरावर केस नव्हते आणि त्याचा चेहरा एखाद्या माणसाच्या बाळासारखा दिसत होता. जन्मानंतर पाच मिनिटांनी या पिल्लाचा मृत्यू झाला होता.