बिनपाण्याची शेती, पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग
विजयपूर : कर्नाटक,एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे. पण ही किमया करुन दाखवली आहे विजापूरच्या राजशेखर निंबर्गी यांनी. नैसर्गिक शेतीची अर्थात झीरो बजेट शेतीमध्ये त्यांनी लिंबाची बाग फुलवली आहे.
एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे. पण ही किमया करुन दाखवली आहे विजापूरच्या राजशेखर निंबर्गी यांनी.नैसर्गिक शेतीची अर्थात झीरो बजेट शेतीमध्ये त्यांनी लिंबाची बाग फुलवली आहे.
कर्नाटकातील विजयपूर जिल्हयातील बेनकनहळी गावात राजशेखर निंबर्गी यांची 45 एकर शेती आहे. त्यातून 52 प्रकारचे धान्य, मसाले आणि फळं त्यांना याच शेतीतून मिळतात. कृषी तज्ज्ञही अचंबित होतील एवढं ज्ञान या चौथी पास शेतकऱ्याकडे आहे.
निसर्ग शेती प्रत्येकाला शक्य आहे. शेतातल्या टाकाऊ वस्तू शेतातच टाकायच्या. त्यावर अच्छादन टाकायचं. ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. कालांतराने या वस्तू कुजतात आणि त्यातून पाणी तयार होतं. हेच पाणी शोषून घेण्याची ताकद झाडांमध्ये असते. त्यामुळे वातावरणात असलेलं पाणी जमिनीत मुरवणं हे सोपं आहे. या अच्छादनामुळे जमीन कायम हिरवीगार राहू शकते, असं राजशेखर निंबर्गी सांगतात.
विजयपूर हा सोलापूरला लागून असलेला जिल्हा. सोलापूरसारखीच दुष्काळी परिस्थिती इथे आहे. धरण, नदी-नाले आणि कालवे अक्षरशः कोरडे ठाक आहेत. त्याच परिसरात राजशेखर निंबर्गी यांची समृद्ध शेती लक्षवेधी ठरते. दर बुधवारी आणि रविवारी निंबर्गी कुटुंबीय दहा हजार लिंबाची तोडणी करतात. म्हणजे महिन्याला 80 हजार लिंबांची तोडणी होते. त्यातून प्रत्येकी दोन रुपयाप्रमाणे त्यांना महिन्याला 1 लाख 60 हजारांचं उत्पन्न मिळतं आणि निंबर्गी त्याला महिन्याचा पगार मानतात. याशिवाय रोपं विक्री, धान्य, फळ, भाजीपाला आणि फळाच्या विक्रीचा हिशेबच वेगळा.
मी सुखी आणि समाधानी आहे. दर महिन्याला लाखो रुपये मला मिळतात. मला ना बँकेचं कर्ज आणि ना मी कोणाच देणं लागतो. माझ्याप्रमाणेच अन्य शेतकऱ्यांनीही अशी शेती करावी. ही सगळी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. गरज फक्त इछ्याशक्तीची आणि मानसिकता बदलण्याची आहे. शासकीय मदत आणि बँकेच कर्ज न घेता शेतकरी सुखी होऊ शकतो, असा सल्ला राजशेखर निंबर्गी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
कर्नाटक सरकारने सर्वोच्च कृषी पुरस्काराने राजशेखर निंबर्गी यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या या शेतीला देशा-विदेशातून अनेकजण भेट देतात.
नैसर्गिक शेती ही जीवनशैली शेतकऱ्याच्या जीवनात शाश्वत स्थैर्य आणू शकते. मी कधी देवाकडे संकट दूर कर म्हणून मागणं मागितलं नाही. कारण मी स्वतः निसर्ग शेतीच्या माध्यमातून देवाची नित्य आराधना करतो. रासायनिक शेती आणि यंत्रसामुग्री वापरणं हा धरणीवर अत्याचार आहे. त्यामुळे देव नक्कीच माझ्यावर रागावणार नाही, असंही हा चौथी पास शेतकरी सांगतो.