डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत; भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल
हिंगोली : ओबीसी सभेला सुरुवात झाली असून, मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे.
“आता नवीन बोलायला लागला. भुजबळ म्हातारा झाला म्हणतो. सर्वच म्हातारे होणार आहे. तुझ्या आई वडील देखील म्हातारे असतील. पण डोक्याचे जेवढे केस पिकले आहे, तेवढे आंदोलन केले आहे. दोन्ही बाजूने अडचणीत आणले जात आहे. एकीकडे कुणबी आरक्षण द्या हे सुरू आहे. दुसरीकडे बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आणि ओबीसींचं आरक्षण (OBC Reservation) काढून घ्या म्हणत आहे,असे भुजबळ म्हणाले.
तर, मी काही बोललो की महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटतं दोन समाजात तेढ निर्माण करतो. त्याच्या 15 सभा सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. भुजबळ यांचा खुटा उपटून म्हणतो, मी काय केले खुटा उपटायला. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात आहे. आम्ही कधी एक टायर जाळला का? त्यांनीचं पेटवले, असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ यांच्याकडून जरांगे यांच्यावर टीका
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येणार आहे. यासाठी पहिला सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झाली, तर दुसरी सभा आज हिंगोलीत होत आहे. या सभेला छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, अपेक्षेप्रमाणे भुजबळ यांच्याकडून जरांगे यांच्यावर टीका देखील करण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे.
आदरांजली अर्पण
“काल 25 नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिदिन झाला. याच दिवशी कसाबने मुंबईवर हल्ला केला. यात अनेकांनी आपला जीव गमावला. तसेच आज संविधान दिवस असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला तुम्हाला लिहण्याचं, बोलण्याचा अधिकार दिला. त्यामुळे या सर्वांना आपण आदरांजली अर्पण करत असल्याचे म्हणत,” भुजबळ यांनी आदरांजली वाहिली.