कंबोडियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बनले आठवे आश्चर्य
जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नसून, ते आग्नेय आशियातील एक देश ‘कंबोडिया’त आहे. तब्बल 162.6 हेक्टर जागेतील हे विष्णुमंदिर बाराव्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरा याने उभे केले होते.
आता या मंदिराने जगातील आठवे आश्चर्य बनण्याचा किताब पटकावला आहे. अर्थात ही यादी अनौपचारिक आहे. यापूर्वी आठवे आश्चर्य म्हणून इटलीतील पोम्पेईचे स्थान होते. आता पोम्पेई या यादीतून बाहेर पडले असून, अंकोर वटला हे अनौपचारिकरित्या स्थान मिळाले आहे.
अंकोर वट हे युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट असलेले स्थळ आहे. हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ असून याबाबत त्याची गिनिज बुकमध्येही नोंद आहे. या मंदिराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या भव्य मंदिराची आखीव-रेखीव रचना, भिंतीवरील शिल्पकृती थक्क करणार्याच आहेत. मंदिरावर अनेक पौराणिक कथांवर आधारित शिल्पकृती पाहायला मिळतात. मंदिराच्या चारही बाजूला पाण्याने भरलेला खंदक आहे. या मंदिरात सूर्योदयाचे सुंदर द़ृश्य पाहण्यासाठीही अनेक लोक येतात. अंकोर वट मंदिराच्या उभारणीसाठी 28 वर्षे लागली होती. सन 1122 ते सन 1150 पर्यंत या मंदिराचे बांधकाम सुरू होते. राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या मृत्यूनंतर या मंदिराचे रुपांतर हळूहळू बौद्ध स्थळामध्ये झाले.