पुराच्या पाण्यात वाहून गेले तीन युवक,पीकअप वाहन 50 फूट खोल नदीत
नागपूर : गोंदिया जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द येथील तीन युवक लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले होते.
त्यांचा तोल गेल्याने तीन युवक नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. तीन युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात आले आहे. दोघांचा शोध सुरू आहे. पुरात वाहून गेलेल्या युवकांचे नाव आशिष बागळे (Ashish Bagle) (24 वर्षे) व संजू बागळे (27 वर्ष) असे आहे. हे दोघेही भाऊ आहेत. तर सागर परतेकी (28 वर्षे) याला वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. दुसरीकडं अकोला जिल्ह्यात नदीच्या पुलाचे कठडे तोडून पीकअप वाहन 50 फूट खोल नदीत कोसळले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने पिकअप वाहन तब्बल 50 फूट खोल नदीत कोसल्याची घटना घडली. यात अपघातात जिल्हातल्या केळीवेळी येथील सचिन मालठे (Sachin Malthe) व विशाल श्रीनाथ दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढण्यात आले आहे. अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.