युद्धानंतर गाझा पट्टीवर कोणाची असणार सत्ता ? ; इस्रायलचे राजदूत म्हणाले
गाझा पट्टीवर सत्ता गाजवणारे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ऑक्टोबरपासून सुरू असून, हे युद्ध काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. परंतु. यात अनेक निरपराध लोकांचेही जीव गेले.
मात्र, इस्रायल हमासचा बिमोड केल्याशिवाय युद्ध थांबणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलाद एर्डन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत युद्धानंतरच्या गाझा पट्टीवर कोणाची सत्ता असेल यावर मोठे भाष्य केले आहे.
इस्रायल संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय शक्तीने गाझाचे नियंत्रण करण्याला विरोध करेल, अशी जाहीर भूमिका एर्डन यांनी घेतली. तसेच सध्याच्या गाझातील परिस्थितीला संयुक्त राष्ट्रच जबाबदार असल्याचा आरोप केला. “आम्ही अरब देशांसाठी ही हमासची घाण साफ करण्याचं काम करत आहोत. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्यात आल्यानंतर आम्ही गाझाच्या भविष्याबद्दल अरब देशांशी चर्चा करू,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
“हमासच्या खात्म्यानंतर गाझाचं अंतरिम सरकार चालवण्याबाबत अरब देशांसाठी लवकरच चर्च सुरू होईल. त्यात इस्रायलचाही सहभाग असेल. मला खात्री आहे की, हमास जशी आमची शत्रू आहे, तशीच ती अनेक अरब देशांचीही शत्रू आहे. हमास अनेक मुस्लीम देशांची शत्रू आहे,” असे मत एर्डन यांनी व्यक्त केले आहे.
इस्रायलचे राजदूत एर्डन यांनी संयुक्त राष्ट्रावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “संयुक्त राष्ट्रामुळेच गाझातील आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रानेच हमासला इस्रायल आणि जगाविरोधात गाझाचा उपयोग युद्ध मशीन म्हणून करण्यास मोकळीक दिली. इस्रायलने हमासविरोधातील युद्ध जिंकल्यावर संयुक्त राष्ट्राबरोबरच्या संबंधांवर इस्रायलने गंभीरपणे विचार केला पाहिजे.”असेही त्यांनी यावेळी म्हटले.
“माझ्यामते संयुक्त राष्ट्रातील जे लोक आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहेत त्या काही अधिकाऱ्यांचा विसा नाकारला पाहिजे. ते हमासने सांगितलेलं खोटं पसरवत आहेत. त्यांच्यामुळे मागील १६ वर्षांपासून हमास संयुक्ता राष्ट्राच्या उपस्थितीत अनेक भयंकर गोष्टी करत आहेत,” असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.