केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी मोठे वक्तव्य केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना, येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात येईल, असे त्यांनी (Nitin Gadkari) म्हटले आहे. त्यावर बंदी घालण्यात येईल.
अलीकडेच असाच एक उपाय त्यांनी सूचविला आहे. विहिरीतील पाण्यापासून ग्रीन हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवारी पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.ते म्हणाले की, आता गाड्यांमध्ये विदर्भात तयार केलेल्या बायो इथेनॉलचा वापर होत आहे.
विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन तयार करून ७० रुपये प्रतिकिलो विक्री होऊ शकते. याच्या अधिक वापरामुळे कोणी पेट्रोल-डिझेलचा वापर करणार नाही. पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, आता फक्त गहू, तांदूळ, मका लावून कोणी भविष्य बदलू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही, ऊर्जा दाता बनण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.