तुझं शिक्षण पूर्ण करतो, लग्नही करतो म्हणून घातली गळ,विद्यार्थिनीला शिक्षकाने नेले पळवून अन…

छत्रपती संभाजीनगरमध्येशिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्नाचे अमिष दाखवून महाविद्यालयातील १२वीच्या वर्गात शिक्षणाऱ्या अल्पवयीन मुलीला शिक्षकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना अजिंठा येथे घडली.
याप्रकरणी ४० वर्षीय शिक्षकाविरूद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी अजिंठा येथील एका महाविद्यालयात १२वीच्या वर्गात शिकत होती. या विद्यार्थिनीला याच कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त देवेंद्र किशोर तायडे या शिक्षकाने विविध आमिषे दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ५ ऑक्टोबर रोजी ही विद्यार्थिनी टीईटी फॉर्म भरायला सिल्लोडला जात आहे, असे सांगून घरातून सकाळी ११:०० वाजता निघून गेली. मात्र ती परतलीच नाही. त्यामुळे या मुलीच्या नातेवाइकांनी तपास करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांनी कॉलेजमध्ये चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला.
मुलीच्या कॉलेजमधील शिक्षक देवेंद्र किशोर तायडे याने, तुझे शिक्षण पूर्ण करेन, लग्नही करेन, असे आमिष दाखवून तिला दुपारी १:०० वाजता एका कारमधून पळवून नेल्याचे समजले. त्यानंतर या महाविद्यालयातील एका शिक्षकाने आणि पीडितेच्या आईने शिक्षक देवेंद्र किशोर तायडे याला फोन केला. त्यानंतर अजिंठा पोलीस ठाण्यात हे प्रकरण पोहोचले. पोलिसांनीही शिक्षक तायडे याला ठणकावले आणि मुलीची माहिती देण्यास सांगितले.
त्यानंतर तायडे याने अल्पवयीन मुलीला ५ ऑक्टोबर रोजीच जळगाव येथून तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये बसवून सायंकाळी ७:०० वाजता घरी परत पाठवून दिल्याचे सांगितले.
याप्रकरणी पीडितेच्या आईने गुरुवारी अजिंठा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षक देवेंद्र किशोर तायडे याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, आरोपी तायडेने अजिंठा, बाळापूर येथील शाळेत असताना तीन मुलींसोबत सोबत असाच प्रकार केला होता. पण एकाही मुलीने किंवा पालकांनी पोलिसांत तक्रार न केल्याने त्याचे धाडस वाढले. त्याने एका मुलीला पळवून नेल्याप्रकरणी जळगाव येथे त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी शिक्षक देवेंद्र तायडे याला दोन मुले असून, तो कुटुंबासह सिल्लोड येथे राहतो, असे पोलिसांनी सांगितले.











