देशात कोरोनाचे २४ तासांत ३,०३८ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या २१,१७९ ‍वर

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या दैनंदिन ३ हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. (Corona updates) देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,०३८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २१,१७९ वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रत्येकी २, जम्मू- काश्मीर, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशातील कोरोनाने ५ लाख ३० हजार ९०१ जणांचा बळी घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दिल्लीतील रुग्णसंख्येत वाढ

दिल्लीत सोमवारी कोरोनाचे २९३ नवे रुग्ण आढळून आले होते. तर दोघांचा मृत्यू झाला येथील पॉझिटिव्ही रेट १८.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रत्येक पाच व्यक्तींच्या चाचणीतून एकजण पॉझिटिव्ह आढळल्याचे दिसून येत आहे. याबाबतची आकडेवारी दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे.

हरियाणात सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना मास्कची सक्ती

हरियाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी १०० हून अधिक लोकांची गर्दी होईल अशा ठिकाणच्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना मास्क घालणे अनिवार्य असल्याचे हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे.

XBB 1.16 व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उच्च अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, देशात XBB 1.16 व्हेरिएंटच्या प्रसारामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते. भारतातील वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, देशात फैलाव होत असलेल्या ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. यामुळे चिंता करण्याची गरज नाही. पण दक्ष राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.’ असे मांडविया यांनी नमूद केले आहे.

ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे चिंता वाढली

देशातील ओमायक्रॉनच्या XBB 1.16 सब व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा हा ताजा सब व्हेरिएंट आहे. ज्या सहा सब व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेचे लक्ष आहे, त्यात XBB 1.16 सब व्हेरिएंट सामील असल्याने भारताच्या चिंतेत भर पडणार आहे.

जगभरात कोरोनाचे रुग्ण आणि संक्रमण कमी होत असले तरी भारतासह काही मोजक्या देशात कोरोना वाढत असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अहवालात नोंदविले आहे. भारतात इतर सब व्हेरिएंटची जागा XBB 1.16 सब व्हेरिएंट घेत असल्याचे कोविड- 19 टेक्निकल लीड विभागाच्या प्रमुख मारिया केरखोव्ह यांनी सांगितले. XBB 1.16 सब व्हेरिएंटच्या ८०० सिक्वेन्सिंगपैकी बहुतांश सिक्वेन्स भारतात सापडले असल्याची माहितीही त्यांनी दिली. XBB 1.16 सब व्हेरिएंटची बहुतेक लक्षणे एक्सबीबी.1.5 सब व्हेरिएंट सारखी असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे सब व्हेरिएंट देखील आपले रूप बदलत असतात, ही खरी चिंतेची बाब असल्याचे केरखोव्ह यांनी स्पष्ट केले.

कोविडविरोधी उपाययोजनांत वाढ

अलिकडील काही दिवसांत देशातील रुग्णसंख्येत झालेली वाढ पाहता अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी कोविडविरोधी उपाययोजनांत वाढ केली. दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, हरियाणा ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.