दुष्काळ जाहीर करा ! सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक होती. बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेकऱ्यांना कर्जमाफी आणि तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारच्या धोरणातून होत आहे. तांदुळाबद्दल मी बोलले, कांद्यावर मी ४ महिन्यापासून बोलत आहे. देशात कांदा उत्पादन जास्त आहे. तर जगात कांदा कमी आहे. त्यामुळे निर्यातीची परवानगी द्या, अशी मागणी मी सरकारला केली होती. मात्र त्यांनी परवानगी दिली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावायचं पाप या सरकारने केलं आहे. कॉर्पोरेट कर आणि उच्च उत्पन्न लोकांचा कर ३० टक्के आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मालावर ४० टक्के कर आहे. हा कुठला न्याय आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुपख्यमंत्री यांना मी आठ दिवसांपूर्वी पत्र लिहले आहे. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा. जनावरांचा चारा, शेतीचं पाणी, पिण्याचे पाण्याचे संकट आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर झाला पाहीजे, महाराष्ट्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.