रशियाकडून भारताला स्वस्तात मिळाले तेल
नवी दिल्ली:यूरोपच्या पूर्व भागात गेल्या दीड वर्षांपासून युध्द सुरू असून त्या युध्दाचा निकाल अद्याप लागलेला नाही. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या या युध्दाचा काही देशांना फायदा झाला असून भारत त्या देशांपैकी एक देश आहे.
युध्द सुरू झाल्यापासून भारताला सवलतीच्या दरात तेलाचा पुरवठा केला जातो आहे. रशियाकडून भारताला हे तेल मिळत असून जूनमध्ये गेल्या दीड वर्षांतील सगळ्यात कमी दरात हे तेल भारताला मिळाले होते.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार रशियातून भारतात आलेल्या कच्च्या तेलाची सरासरी किमत जून महिन्यात सगळ्यांत कमी होती. केवळ 68.17 डॉलर प्रति बॅरल दर तेंव्हा होते. त्यापूर्वी रशियाकडून मिळणाऱ्या या तेलाचा दर 70.17 डॉलर प्रति बॅरल इतका होता.
जूनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर 80 डॉलरपेक्षा जास्त होते. मात्र तेच भारताला 68. 17 डॉलरने अन्य खर्चांसह मिळाले. याचा अर्थ प्रत्येक बॅरलवर भारताची 15 ते 20 डॉलरची बचत झाली. त्याच्या एक वर्षापूर्वी भारताला 100 डॉलर प्रति बॅरल या भावाने तेल मिळत होते.
रशियाने गेल्या वर्षी फेब्रवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केला होता. तेंव्हापासून युरोपच्या पूर्व भागातील या दोन देशांमध्ये युध्द सुरू आहे. युध्दामुळेच अमेरिका आणि तिच्या सहकारी देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिका आणि ही राष्ट्रे युक्रेनला मदत करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी रशियाच्या कच्च्या तेलावरही निर्बंध घातले आहेत. मात्र भारत आणि चीन या दोन्ही देशांनी याचा लाभ घेतला असून रशियाकडून या दोन देशांनी सगळ्यांत जास्त तेल खरेदी केली आहे.
मात्र आता उपलब्ध आकडेवारीनुसार रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात गेल्या दोन महिन्यांपासून घटत चालली आहे. चालू महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये ही आयात आणखी कमी होण्याचे अनुमान काढण्यात आले आहे. तथापि, ऑक्टोबरमध्ये आयात पुन्हा वाढू शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आपल्या उर्जासंबंधी गरजांसाठी भारत बऱ्यापैकी अन्य देशांवर अवलंबून आहे. आपल्या एकूण गरजेच्या 88 टक्के तेल भारत आयात करतो. सध्या भारत रशियासोबतच इराक आणि सौदी अरब यांच्याकडूनही ठिकठाक प्रमाणात तेल आयात करतो आहे.
जून महिन्यात भारताला इराककडूनही प्रति बॅरल 67.10 डॉलर या दरात तेल मिळाले होते. तेच सौदी अरबमध्ये कच्च्या तेलाचा 81.78 डॉलर प्रतिबॅरल भाव आहे.