ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उच्चशिक्षित तरुणाने फुलविली गुणकारी ड्रॅगन फ्रूटची शेती


आळेफाटा : कुकडी प्रकल्पाच्या जोरावर जास्तीत जास्त बाजारभाव मिळणारी पिके, फळे घेण्याकडे कुकडी नदी काठावरील शेतकरी पुढाकार घेत आहेत. यामुळे बहुतांश शेतकरी लखपती बनले आहेत.
कुकडीच्या पाण्यामुळे सुजलाम् सुफलाम् झालेल्या बोरी बुद्रूक (ता.
जुन्नर) येथील उच्च शिक्षित ओंकार मच्छिंद्र चौधरी या तरुणाने औषधी गुणधर्म असणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. रासायनिक खते टाळून जैविक खतांच्या जोरावर बहरलेल्या शेतीतून या हंगामात सुमारे सहा टन उत्पादन मिळण्याचा विश्‍वास आहे.

ड्रॅगन फ्रूटद्वारे २५ वर्षे शाश्‍वत उत्पादन मिळणार असल्याची विश्‍वास ओंकारने व्यक्त केला आहे. लागवडीपासून ड्रॅगन फ्रूटच्या संगोपनासाठी त्याला पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे. बी.आय.टी.(Bachelor in Information Technology) चे शिक्षण घेतलेल्या ओंकारची ड्रॅगन फ्रूटची प्रयोगशील शेती तरुण शेतकऱ्यांसाठी वस्तुपाठ ठरली आहे.

दरम्यान, पहिल्याच तोड्यात २०० किलोच उत्पादन मिळाले आहे. त्यास व्यापाऱ्याने बांधावरच प्रतिकिलोस १५० रुपये बाजारभाव दिला. कोरोना काळात ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा अभ्यास करून बाजारभावाचा वेध घेतल्याने नवीन प्रयोग करण्याचे ठरविल्याचे ओंकार याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

अशी केली लागवड

३५ गुंठे क्षेत्राची यासाठी निवड

सहा बाय दहा फुटांच्या अंतरावर बेडची निमिर्ती

बेडवर शेणखत टाकून ट्रॅक्टराद्वारे मल्चिंग पेपर टाकला

सहा फुटांवर सिमेंटच्या पोलची उभारणी

सिमेंटचीच गोल रिंग बसविली

सोलापूर ठिकाणाहून संजीवनी ड्रॅगन फ्रूट या जातीची २४०० रोपांची लागवड

या आजारांसाठी उपयुक्त

हृदय विकार

त्वचा रोग

मधुमेह

पचनक्रिया

कर्करोग

निरोगी हाडे

डोळ्यांचे आजार

मागील चार वर्षातील बाजारभाव

२०२३ – १५०

२०२२ – १५०

२०२१ – २५५

२०२० – २६०

फळांना ४०० बल्पद्वारे उष्णता

ड्रॅगन हे पीक जुलै ते ऑक्टोबर हे चार महिने अधिक बहरले चालते. फळांसाठी उष्ण हवामानाची गरज असते. यामुळे ओंकार चौधरी यांनी संपूर्ण बागेत झाडावर ४०० बल्ब रात्रीच्या वेळी लावून रोपांना उष्णता दिली. यासाठी त्यांना अमोल कोरडे, प्रतीक कोरडे, मच्छिंद्र चौधरी, रवींद्र औटी, प्रदीप जाधव, विजय चौधरी, स्वप्नील कोरडे आदींनी मार्गदर्शन केले.

कमी पाणी असलेल्या जमिनीवर तसेच दुष्काळी परिसरात हे पीक चांगले आकार घेतले. औषधी समजलेले हे फळ भारतातील केरळ, अंदमान निकोबार बेट, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिसा, गुजरात या राज्यांमध्ये या फळाचे उत्पादन होते. यातून चांगले आर्थिक उत्पादन मिळते म्हणून ड्रॅगन फ्रूड शेतीचा प्रयोग केला आहे. यातून भविष्यात शाश्‍वत उत्पादन मिळेल.

– ओंकार चौधरी, ड्रगन फ्रूट उत्पादक


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button