परीक्षा हॉलमध्ये फेकला रंगाचा फुगा, उत्तरपत्रिकांवर पसरले शिंतोडे
छत्रपती संभाजीनगर : दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना टवाळखोर तरुणांच्या टोळक्याने खिडकीतून रंगाचा फुगा फेकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पेपरवर शिंतोडे उडाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली.
दरम्यान, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनी तत्काळ परीक्षा कक्षाच्या खिडक्या लावून घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला. ही घटना छावणी परिसरातील लिटिल फ्लाॅवर हायस्कूलमध्ये सोमवारी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान घडली.
केंद्र संचालकांनी ही बाब शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, बोर्ड सचिव विजय जोशी यांना लगेचच कळविली. त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची सूचना दिली. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवर रंगाचे डाग पडले, त्यात विद्यार्थ्यांचा दोष नाही, असा अहवाल सादर करण्याचे सूचित केले. त्यानुसार केंद्र संचालकांनी तसा अहवाल बोर्ड आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. तरुणांच्या टोळक्याने फुगा फेकला. हे कृत्य एका शिक्षकाने मोबाइलमध्ये कैद केले आहे. तो पुरावा पोलिसांकडे देण्यात येणार आहे.
टवाळखोरांचा त्रास नेहमीचाच
यासंदर्भात केंद्र संचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वर्गात पंखे आहेत; पण पेपर लिहिताना पाने उडतात म्हणून विद्यार्थी पंखे बंद करायला सांगतात.
सूर्यप्रकाश व खेळत्या हवेसाठी सोमवारी परीक्षा कक्षाच्या खिडक्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या.
ही संधी साधून टवाळखोरांनी डाव साधला. यापूर्वीही वर्ग सुरू असताना टवाळखोरांनी खिडकीतून दगड फेकला होता.
नशीब बलवत्तर म्हणून एका विद्यार्थिनीच्या डोक्याजवळून हा दगड गेला.
‘मराठी’च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका
धाराशिव : दहावीच्या परीक्षेत शहरातील एका केंद्रावर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमाची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी समाेर आला. पेपरची वेळ संपल्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांत एकच गाेंधळ उडाला. पहिल्या पाच मिनिटांतच हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांनी परीक्षा हाॅलमधील गुरुजींना कल्पनाही दिली; परंतु त्यांनी दखल घेतली नाही, असा आराेप विद्यार्थ्यांसह पालकांनी केला.