ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकण विकासाचे नवे पर्व – मुख्यमंत्री


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत अनेक सर्वसामान्य माणसांना सुखद अनुभव येतोय, हे सरकार ख-या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार वाटू लागले आहे. मंत्रालयात येणा-या प्रत्येक नागरिकाला भेटणे, त्यांचे लक्षपूर्वक ऐकणे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित खात्याला तिथल्या तिथे आदेश देणे, अशी साधारणत: मुख्यमंत्र्यांची कार्यपध्दती राहिली आहे.
सतत कार्यमग्न असणे हा त्यांचा स्वभाव आहे. जनसामन्यात एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्येही एकरुप होणे याची प्रचीती वारंवार त्यांच्या दौ-यादरम्यान दिसून येते. उदाहरणच द्यायचे झाले तर, नुकताच रत्नागिरी येथे झालेल्या शासकीय व उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कौशल्य विकास वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री विद्यार्थ्यासोबत रमले. सुरक्षेचे कोणतेही कारण न सांगता विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढली. एवढेच नव्हे तर त्यांच्यात मिसळून मनमोकळया गप्पा देखील केल्या. पनवेल-रायगड येथे “फाईव्ह जी नेटवर्कच्या” राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमात तर मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी मुलांसमवेत बेंचवर बसणे पसंत केले. फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होऊन, स्मार्ट क्लासमध्ये परिवर्तन होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौटुंबिक जबाबदारीमुळे मला शिक्षण घेता आले नाही, परंतु नुकतेच मी माझे बीए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. हे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. यापुढील काळातही आणखी ब-याच गोष्टी करायच्या आहेत. इतके वर्ष समाजात काम करताना मला जगाच्या विद्यापीठाने खूप काही शिकवले. सर्वांत महत्वाची गोष्ट मी शिकलो. ते म्हणजे विनम्रता, असे उद्गार ठाणे जिल्हयातील नेरुळ येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या वतीने डी.लिट पदवीने सन्मान करण्यात आला त्यावेळी त्यांनी काढले. श्री.शिंदे आपला वाढदिवस कोणताही बडेजाव न करता ठाण्यातील स्वयंम दिव्यांग पुर्नवसन केंद्राच्या वतीने स्व.गंगूबाई शिंदे बहुउद्देशिय सभागृहात दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळया वेगळया पध्दतीने साजरा करतात. त्यानंतर ते दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करतात. आगळे-वेगळे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा लोकांमध्ये उभी राहते आहे हे विशेष होय.

गुरुपौर्णिमे निमित्त टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमात येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहिल अशी ग्वाही देखील दिली. एकूणच काय तर श्री.शिंदे यांचे व्यक्तीमत्व म्हणजे “पानी रे पानी तेरा रंग कैसा” जिसमे मिलाओ उस जैसा, असे म्हटले तरी वावगे ठरु नये!

अशा बहुआयामी हरहुन्नरी श्री.शिंदे यांनी कोकणातील सर्वांगीण विकासासाठी तत्पर असल्याचे गेल्या वर्षभरात कोकण विभागासाठी केलेल्या विविध लोकोपयोगी योजना आणि घोषणा यावरुन दिसून येते. कोकणाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही एक नांदीच ठरेल.

कोकणातील सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर असणारे मुख्यमंत्री

नुकताच ठाणे जिल्हयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी “हर घर जल प्रमाणेच हर घर ऊर्जा” हे उदिष्ट ठेऊन राज्यातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार व्यक्त करतांना शहापूर सारख्या आदीवासी तालुक्यात ऊर्जा महोत्सव घेऊन ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य प्रकाशमय करण्याचे काम श्री.शिंदे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, मंत्रीमंडळ बैठकीत वीज वितरण सुधारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला . त्यामुळे वीज गळती आणि वितरणातील हानी कमी होईल. राज्यातील ग्राहकांसाठी प्रीपेड-स्मार्ट मीटर बसविण्यात येतील त्याचा १ कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल.

मुंब्रा जक्शंन

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. हा महामार्ग मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा – कल्याण फाटा जंक्शन या भागातून जात असल्यामुळे त्या भागाचा विकास होतआहे.

मुंब्रा वाय जंक्शनवरील एमएमआरडीएने बांधलेल्या ३ ३ अशा दुहेरी मार्गिकेच्या या उड्डाणपुलामुळे जेएनपीटीकडून येणारी अवजड वाहतूक आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक विभक्त होते. त्यामुळे जेएनपीटी आणि गुजरातच्या सीमेवरून येणाऱ्या अवजड कंटेनरच्या वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल उपयुक्त ठरेल. तसेच मुंब्रा शहरातून येणाऱ्या स्थानिक वाहतुकीमुळे होणारी गर्दीदेखील टळेल.

विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत पुलाचे बांधकाम

शिळफाटा, डोंबिवली/ कल्याण या भागांमधील विकासकामांमुळे निवासी संकुलामध्ये नागरी वाढ लक्षात घेता हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. या प्रकल्पामध्ये रस्ता रुंदीकरणासह उड्डाणपूलाच्या बांधकामाचा अंतर्भाव आहे. सदर उड्डाणपुलाची एकूण लांबी पोहाचमार्गासह ८२० मी. असून रुंदी २४.२० मीटर (३ ३ मार्गिका) इतकी आहे. शीळफाटा रस्त्याला पर्यायाचा विचार, शिळाफाटा ते भिवंडी मल्टिलेव्हल रस्ता असे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत.

बाळासाहेबांच्या काळातील दादोजी कोंडदेव स्टेडियम कात टाकतेय. या स्टेडियमच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. वाड्यापाड्याचे टुमदार जुने ठाणे विकसित होत आहे. ठाण्यात भविष्याच्या दृष्टीने नवनवीन बदल होत आहेत. यामुळे ठाणेकरांना आधुनिक सेवासुविधा मिळत आहेत. ठाण्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. ही कंपनी सुमारे 250 कोटीची गुंतवणूक करुन याद्वारे जेनेरीक औषधांची निर्मिती करणार आहे. यामुळे सुमारे 500 ते 600 रोजगार निर्मिती होणार आहे.

अमृत महाआवास अभियान

नव्याने सुरु होत असलेल्या अमृत महाआवास अभियान कालावधीत सन २०२१-२२ करीता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करीता ठाणे जिल्ह्याला २ हजार ८१८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. यापैकी २ हजार ३३० लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली असून उर्वरीत ४८८ मंजुरीची कार्यवाही सुरु आहे. तसेच आदिम, रमाई व शबरी या राज्य पुरस्कृत योजनांकरिता ८९७ चे उद्दिष्ट प्राप्त असून, त्यापैकी ६४२ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. अजून २५५ मंजुरीची कार्यवाही सुरु आहे. हे सर्व मंजुर घरकुले १०० दिवसांत पूर्ण करुन राज्यामध्ये अव्वल कामगिरी बजावत अमृत महाआवास अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांक पटकावण्याकरीता प्रयत्नशील आहे.

नवीन रेल्वे स्थानकाचा लाभ ठाणेकरांना

ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जमीन मिळण्यातील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे नवीन स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्थानकामुळे मूळ ठाणे स्थानकावरील ताण कमी होईल आणि लाखो ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल.

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर विकसित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर 138 कोटी रुपये शिवमंदिर परिसराच्या विकासासाठी दिले. त्याशिवाय या शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घनकचरा प्रकल्पासाठी १५० कोटी, रस्त्यांच्या कामासाठी २२२ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेतून १०७ कोटी, दलित वस्तीमधून 32 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण मधून ७८ कोटी, इतर कामासाठी ४८ कोटी निधी दिला आहे.

दिवा शहरातील अनधिकृत इमारती हद्दपार

सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येणार आहे. दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली.

आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकाळी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 कोटी असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येणार आहे.

कल्याणमध्ये दीड लाख लाभार्थींना लाभ दिला. प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार , तालुक्यात १५ हजार आणि गावात किमान १०० लाभार्थींना योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे यादृष्टीने सर्व तयारी केली. या अभियानासाठी १६ हजार योजना दूत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु केले आहेत त्यातून नियोजन होते आहे.

रायगड जिल्हा अधिक विकासाठी सज्ज

चवदार तळयाच्या सुशोभिरणासाठी निधी देणार. सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा आहे.

प्रगती, समृद्धी आणि विकासाची गंगा घराघरामध्ये पोहोचविण्याचे सर्व त-हेचे प्रयत्न सुरु आहेत. आंबा प्रक्रिया उद्योग, काजू विकास महामंडळ, कांदा प्रक्रिया, असे विविध शेतीपूरक उपक्रम राबविले जात आहेत. यासाठी दोनशे कोटी रुपये देण्याचे शासनाने ठरविले आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण केले जाणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिपूर्ण विकासाच्या वाटेवर

कोकणातील सर्व जिल्हयांच्या सर्वागीण विकासाठी कोकण महानगर विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार आहे. रत्नागिरी जिल्हयाच्या विकास कामांचा आढावा प्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी घोषणा केली.

शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या शासन आपल्या दारी या महत्वाकांशी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला ‘जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकली व चार बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

गेल्या अकरा महिन्यात ३५ कॅबिनेट बैठका आणि त्यातून ३५० निर्णय हे सर्वसामान्य माणसांच्या हिताचे घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुखी समाधानाचे दिवस यावेत, शासनाविषयी जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी जिल्ह्याकरीता 50 नवीन बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

निसर्ग चक्रीवादळानंतर ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण’ प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहर व परिसरातील सर्व विद्युत वाहिन्या भूमिगत पद्धतीने असाव्यात असे नियोजन करण्यात आले. या कामी 97 कोटी खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाचे 73 टक्के काम पूर्ण झाले आहे.

सागरी, डोंगरी, नागरी पालघर जिल्हा

मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी योजना केली जात आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय पॉलिसी बाबत अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.

कोकण विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. राज्यातील गड किल्ल्यांच्या बरोबरच कोकण विभागातील गड किल्ल्यांच्या बाबत निर्णय घेतले जातील. केरळ प्रमाणे बॅक वॉटर मध्ये पर्यटनवाढीसाठी बांधा आणि वापरा तत्वावर विविध सेवा सुविधा पुरवल्या जातील. कोकणातील साकव, विम्यातील त्रुटी, बीच डेव्हलपमेंट साठी प्रयत्न, सिंचनाच्या सुविधा याबाबत प्रयत्न केले जातील. औरंगाबाद पुणे मार्गाच्या धरतीवर मुंबई ते सिंधुदुर्ग हा एक्सेस कंट्रोल मार्ग करता येईल का? याबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गगनभरारी’ ही योजना सुरू करण्यात आली असून, यातून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ‘नासा’ प्रशिक्षणासाठी पाठवण्याची योजना आहे. गोळप येथे एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्पही उभारण्याची योजना सुरु आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाध्ये रोजगार मेळावा घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. राज्यांमध्ये 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना या अभियानाच्या माध्यमातून पोहचविल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत जोपर्यंत योजना पोहचणार नाही तोपर्यंत सरकार काम करीत राहिल सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षाभरापुर्वी स्थापन झाले. या सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्तीक लाभ होईल, असा निर्णय शासनाने घेतलेला नाही. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून हे शासन काम करत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाअंतर्गत देण्यात आला.

वर्षभरात कोकण विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले दौरे आणि कामाची गती पाहता असे लक्षात येईल की, मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाचा विकास हा केंद्रबिंदू ठेऊन कोकण विकासाचे नवे पर्व उभे करीत आहे. यातून कोकणी माणूस सुखी व समाधानी दिसत आहे.

संजीवनी जाधव-पाटील

सहाय्यक संचालक (माहिती)

कोकण विभाग, नवी मुंबई


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button