ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुका म्हणे धावा…पंढरी विसावा


पंढरी समीप आल्याने केलेला धावा… बोंडले गावात संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका या दोन संतांची बोंडले झालेली भेट… पिराची कुरोलीत समाधी समोर झालेली आरती… असा भावभक्तित रंगलेला सोहळा संध्याकाळी समाज आरतीने विसावला.
पांडुरंगाच्या ओढीने निघालेला सोहळा बोरगाव येथून सकाळी महाभिषेक झाल्यावर सात वाजता मार्गस्थ झाला. आज पहिला व दुपारच्या विसावा माळखांबीला झाला. हे अंतर चार किलोमीटरचे आहे. गावात पालखी पोचताच पादुकांची पूजा झाली. त्यानंतर दर्शनासाठी पादुका ठेवल्या. न्याहरीएवजी सकाळी थेट जेवण झाले. त्यानंतर मोठा विसावा घेत सोहळा अकरा वाजता माळखांबीहून निघाला.

माळखांबी गाव लोकवस्तीने छोटे आहे. त्यामुळे दिंड्या पुढे येऊन थांबतात. या मार्गावर विविध प्रकारच्या फळबागा आहेत. वारकरी फळबागेतील सावलीला बसले होते. सोहळा येताच ते आपापल्या दिंडीत सहभागी होत होते.

माळखांबी ते बोंडले गावापर्यंतचा टप्पा पाच किलोमिटरचा आहे. हे अंतर चालण्यासाठी दीड तास लागला. साडेबारा वाजता सोहळा बोंडले गावाच्या खिंडीत आला. येथून रस्त्याला एक किलोमीटचा उतार आहे.

येथे येताना सर्व दिंड्यांमध्ये सिंचन करिता मूळ । वृक्ष ओलावे सकळ॥ हा अभंग सुरू होता. या अभंगाचे शेवटचे चरण तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ॥ हे आहे.

एक- एक दिंड्यांना वरील अभंगाचे चरण ‘तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा’ असे म्हणत रथापुढील २६ दिंड्यांना चोपदार नामदेव गिराम यांनी सोडल्या. वारकरी त्या उताराने धावत सुटले. पंढरी समीप आली म्हणजे आजच्या मुक्कामापासून पंढरपूर अंतर अवघे २० किलोमीटर अंतर राहिले आहे. पाऊणे बारा वाजता श्रीतुकोबारायांची पालखी धाव्याच्या ठिकाणी पोचली. त्यावेळी देवस्थानचे आजी माजी पदाधिकारी रथासमोर होते. त्यांनीही धावा केला. एक वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी बोंडले गावात पोचली.

धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ॥

संदेहाची सुटली गांठी । झालो पोटीं शीतळ ॥

दरम्यान, दुपारी दीड वाजता संत सोपानकाका, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथ शेजारी शेजारी आला. दोन्ही संस्थानच्या वतीने संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी तसेच पुंडलिक महाराज मोरे यांनी एकमेकाना नारळ प्रसाद दिला. भाळवली टप्पा ओलांडून पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. पिराची कुरोलीत संस्थानच्या माजी अध्यक्षा ताराबाई इनामदार मोरे यांची समाधी येथे आहे. तेथे आरती करण्यात आली.

आज उभे रिंगण

सोमवारी रात्री हराळकर दिंडीच्या वतीने कीर्तन व जागर झाला. तर मंगळवारी सकाळी सात ते नऊ असे मालक देहुकरांच्या वतीने कीर्तन होणार आहे. त्यानंतर, बारा वाजता सोहळा मार्गस्थ होईल. उद्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button