मागेल त्याला मिळेल विहीर आणि सोबत मिळेल सोलर पंप! वाचा या योजनेविषयी माहिती
शेती म्हटले म्हणजे भरघोस उत्पादनासाठी पिकांची लागवड ते पिकांची काढणी पर्यंतचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असतेच. परंतु पिकांना सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये किंवा पावसाळ्यात देखील बऱ्याचदा पावसाचा खंड पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना संरक्षित पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहिरी आणि बोरवेल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.
परंतु विहीर खोदणे हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसते. कारण यासाठी येणारा खर्च हा खूप मोठा असतो. याच दृष्टिकोनातून शासनाच्या काही योजनांच्या माध्यमातून विहीर आणि बोरवेल साठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. या योजनांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खूप महत्त्वाची असून या अंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेविषयी आपण या लेखात माहिती घेऊ.
रोजगार हमी योजनेतून आता मिळणार विहीर अनुदान
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीरिकरिता अगोदर तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. परंतु यामध्ये आता वाढ करण्यात आली असून तीन ऐवजी आता शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान विहीर खोदण्यासाठी मिळते. एवढेच नाही तर विहीर खोदल्यानंतर त्यातून पाणी उपसा करण्यासाठी कृषी पंपाची आवश्यकता असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बांधवांना सोलर पंप देखील देण्यात यावा असे देखील या संबंधीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.एवढेच नाही तर शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर करता यावा याकरिता तुषार व ठिबक सिंचनाची सुविधा देखील देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी कोण असते पात्र?
त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री कर्ता असलेले कुटुंबे, शारीरिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी, अडीच एकर पर्यंत जमीन असलेले सीमांत शेतकरी व ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी यासाठी पात्र असतात.
या योजने करता लाभार्थी अटी
1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 एकर क्षेत्र सलग असणे गरजेचे आहे.
2- ज्या ठिकाणी विहिर खोदायची आहे त्या ठिकाण पासून पाचशे मीटरवर विहीर नसावी.
3- तसेच दोन विहिरींमधील कमीत कमी दीडशे मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती, दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरता लागू करण्यात येणार नाही.
4- तसेच या योजनेच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याच्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद नसावी.
5- तसेच लाभार्थ्याकडे जमिनीचा ऑनलाईन दाखला असावा.
6- जर एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशावेळी प्रत्येकाचे एकूण जमिनीचे सलग क्षेत्र 0.40 आरपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
7- यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.
लागतील ही कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सातबारा उतारा( ऑनलाइन ), तसेच आठ अ चा उतारा देखील ऑनलाइन असणे गरजेचे आहे. त्यासोबतच जॉब कार्डची झेरॉक्स प्रत, आणि संयुक्तपणे जर या योजनेमार्फत विहीर घ्यायची असेल तर सर्व लाभार्थ्यांचे पाणी वापराबाबतचे करार पत्र यासाठी आवश्यक असते.