ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोयाबीनच्या दराची घसरण थांबेना; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुटेना!


लातूर : जिल्ह्याचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. परिणामी, भाववाढीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक संकट सुटेनासे झाले आहे. वास्तविक, जूनमध्ये सर्वाधिक भाव मिळण्याचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा हवेतच विरत आहेत. त्यातच अद्यापही वरुणराजाची बरसात नसल्याने धास्ती वाढली आहे.



जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र जवळपास साडेसहा लाख हेक्टर आहे. त्यावर दरवर्षी सोयाबीनचा साधारणत: ५ लाख हेक्टरवर पेरा होतो. विशेषत: दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला जवळपास ११ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. आजपर्यंतच्या इतिहासातील तो अति उच्च भाव ठरला. आगामी काळातही असाच चांगला भाव मिळेल, या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला आहे. विशेषत: खरिपाबरोबरच उन्हाळी सोयाबीनचे उत्पादनही घेतले जात आहे.

बाजारपेठेत चांगला दर मिळेल म्हणून जिल्ह्यातील जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गत हंगामातील अद्यापही सोयाबीनची विक्री केली नाही. मात्र, वास्तवात नोव्हेंबरनंतर अद्यापही सोयाबीनच्या भावात वाढ झाली नाही. दर महिन्यात दर घसरतच आहेत. त्यामुळे अधिक भावाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

गत नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक मिळाला दर…
महिना सरासरी भाव
ऑक्टोबर- २०२२ ५२००
नोव्हेंबर ५९००
डिसेंबर ५६००
जानेवारी- २०२३ ५५७५
फेब्रुवारी ५३५०
मार्च ५२७०
एप्रिल ५३००
मे ५२६०
जून ५१००

तीन वर्षांपासून सातत्याने घसरण…
सोयाबीनला २१ जून २०२१ रोजी सर्वसाधारण ७ हजार १७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. २१ जून २०२२ रोजी ६ हजार ४६० तर २१ जून २०२३ रोजी ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा भाव लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे.

दाेन वर्षांपासून दर वाढीची प्रतीक्षा…
भविष्यात दर वाढतील म्हणून मी दोन वर्षांपासून सोयाबीनची साठवणूक केली. मात्र, दरवाढीऐवजी घसरणच होत आहे. त्यामुळे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. खरीप पेरणीसाठी बी- बियाणे, खते कशी खरेदी करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– ज्ञानेश्वर नारागुडे, शेतकरी.

मागणी नसल्याने दरात घट…
विदेशातील खाद्यतेलाची आयात होत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनला मागणी कमी आहे. परिणामी, दरात वाढ झाली नाही. पाऊस लांबल्यास १००-१५० रुपयांनी भाव वाढू शकतात.
– बालाप्रसाद बिदादा, संचालक, बाजार समिती.

खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याचा परिणाम…
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. जागतिक स्तरावर खाद्यतेलाचे भाव घसरले आहेत. शिवाय, विदेशात पामतेलाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर डीओसीचे देशात भाव अधिक असल्याने निर्यात होत नाही. परिणामी, सोयाबीनच्या दरात वाढ होत नाही.
– अशोक लोया, सोयाबीन खरेदीदार.

सोयबीनची गरजेपुरतीच विक्री…
सध्या बाजार समिती सोयाबीनची आवक घटलेली आहे. शिवाय, भावही वाढलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी गरजेनुसार सोयाबीनची विक्री करीत आहेत. परिणामी, बाजारपेठेतील उलाढालही कमी झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button