गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन २०१५- २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत होती. आता राज्य शासनाकडून १९ एप्रिल २०२३ पासून ही योजना सानुग्रह अनुदान तत्वावर संपूर्णपणे कृषी विभागाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने ३ वर्षे कालावधीसाठी राबविण्यात येत आहे.या योजनेविषयी…..
योजनेची वैशिष्ट्ये –
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार शेतकरी म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य ( शेतकऱ्याची पती-पत्नी, आई-वडील, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील दोन जणांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासासाठी लागू राहील. लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदारांने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत लाभास पात्र असणार नाही.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यपद्धत –
१) शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर संबधित अपघातग्रस्त शेतकरी/शेतकऱ्यांचे वारसदार यांनी निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावा.
२) प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून अहवाल तहसिलदार यांना ८ दिवसात सादर करावा.
३) तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त अहवालाची छाननी करून पात्र प्रस्ताव तहसिलदार यांना सादर करावा.
४) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधितांना मदत देण्याबाबतचा निर्णय घ्यावा.
५) तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत संबंधितांच्या बँक खात्यात ईसीएस द्वारे निधी अदा करावा.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना पात्रतेसाठी रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश/विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावल्यामुळे जखमी/मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तर या योजनेसाठी नैसर्गिक मृत्यू, पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, आमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटर्स शर्यतीत अपघात, युद्ध सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकांकडून खून या बाबी योजनेच्या पात्रतेसाठी समाविष्ट नाहीत.