पुणे: पहिल्याच महिन्यात 228 मिळकती सील

पुणे: मिळकत कर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून, गेल्या वीस दिवसांत 228 मिळकतींना सील केले आहे. या कारवाईमध्ये 12 कोटीची थकबाकी वसूल झाल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.महापालिकेकडून मिळकत कर वाढीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहेत. तसेच निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांची व्यावसायिक दराने आकारणी करण्यासाठीदेखील नियोजन केले आहे. पालिकेची मिळकत कराची थकबाकी 9 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये कराची मागणी 3 हजार 30 कोटी रुपयांची असून, 6 हजारांहून अधिक उर्वरित रक्कम तीनपट शास्ती आणि दंडाची रक्कम आहे. प्रामुख्याने न्यायालयात कुठलाही वाद नसताना मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या सुमारे 12 हजार 500 मिळकतींवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. यापैकी बहुतांश मिळकती व्यावसायिक आहेत. या मिळकतींना वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या असून, सील करण्याची कारवाई केली जात आहे.