अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी रहस्यमयी विमानाचा पाठलाग केला; व्हर्जिनियात कोसळले, चार ठार
अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये रविवारी एक विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या विमानामध्ये चार लोक होते, त्यांचा मृत्यू झाला आहे. या विमानाला रहस्यमयी म्हटले गेले होते, हे विमान वॉशिंग्टनच्या आकाशात घिरट्या घालत होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा हे विमान अनियंत्रित झाले आणि जमिनीवर कोसळले.
अमेरिकेचे राज्य व्हर्जिनियाच्या शेनानडोह डोंगररांगांतील एका ग्रामीण भागात हे विमान कोसळल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. जोपर्यंत पोलीस पोहोचले तोवर विमानातील कोणीही जिवंत नव्हते, असे ते म्हणाले.
वॉशिंग्टनमध्ये जेव्हा या विमानाचा पाठलाग केला जात होता, तेव्हा सोनिक बुमचा आवाज देखील ऐकायला आला होता. या आवाजामुळे लोकांना त्रासही झाला. या विमानाचे नाव सेसना 560 होते. बचावपथके जवळपास चार तासांच्या पायी प्रवासानंतर विमानाजवळ पोहोचले होते.
एनटीएसबीने म्हटले की या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. एफ १६ या लढाऊ विमानांनी या विमानाच्या पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, समोरून कोणतेही उत्तर आले नाही.