शरद पवारांनी उमेदवार घोषित केला? मात्र काँग्रेसवाले म्हणतात…; या जागेवरून वादाची शक्यता
गडचिरोली: गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळेल अशी चर्चा असताना ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी, असा आग्रह गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे धरला. त्यांनीसुद्धा आगामी लोकसभा निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचाच उमेदवार उभा राहील, असे आश्वासन या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबईतील टिळक भवन परीसरातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात शुक्रवार (ता. २) लोकसभा निवडणूक २०२४ आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे. विधिमंडळ पक्षनेता बाळासाहेब थोरात, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सह प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशीष दुवा व सोनम पटेल, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे.
प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, बसवराज पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी येथील राजकीय परिस्थितीची वरिष्ठांना माहिती दिली. सोबतच हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून वर्तमान परिस्थितीतही स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमधील निवडून आलेल्या सदस्यांची संख्या पाहता काँग्रेस पक्ष वरचढ ठरत आहे.
म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी,असा आग्रह सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांपुढे केला. यावेळी वरिष्ठांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा काँग्रेस कोट्यातच राहील, असे आश्वस्त केले.
काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही भुलथापांना बळी न पडता अधिक जोमाने कामाला लागावे, अशी सूचनाही दिली. या बैठकीला गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव माजी आमदार अविनाश वारजूकर. आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आमदार सहसराम कोरोटे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, विश्वजीत कोवासे,जेसा मोटवानी, सतीश वारजूकर, मुस्ताक हकीम, मनोहर पाटील पोरेट्टी, वामनराव सावसाकडे, लॉरेन्स गेडाम, छगन शेडमाके आदी उपस्थित होते.
शरद पवारांचा शब्द खोटा ठरणार का ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मागे आपल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यात देसाईगंज येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार असून विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तयारीला लागावे, असा जाहीर आदेश दिला होता.
पण काँग्रेस ही लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडणार नसल्याने शरद पवारांनी धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेला शब्द खोटा, तर ठरणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.