विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके; शालेय विभागाचे नियोजन
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तके सर्व तालुकास्तरावर पोचली असून शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येईल असे नियोजन केले आहे.जिल्ह्यातील ४ हजार २३८ शाळांमध्ये ५ लाख २५ हजार ५६० विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तक पुरवली जाणार आहेत.
राज्य शासनाने शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाचे ओझे कमी करण्याच्या उद्देश पूर्ण करण्यासाठी पुस्तकात वह्यांची पाने जोडली आहेत. यासाठी एकत्रित विषयानुरूप आशयांचे एकात्मिक पुस्तक निर्मिती केली आहे.
वह्यांची पाने जोडल्याने लेखन सरावासाठी व अभ्यासास पूरक ठरणार असून ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
केंद्रांतर्गत शाळांसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून पुस्तके नेण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. तर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांना केंद्रातून पुस्तके न्यावी लागतात. विशेषतः केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांना पदरमोड करून पुस्तकांची वाहतूक करावी लागते. पुस्तक वाटप योजना ही शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देणारी जरी असली तरी शिक्षकांसाठी ती मोठी डोकेदुखी ठरत आहे.
पुस्तकांच्या वाहतुकीसाठी शिक्षण विभागाकडे स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे हा खर्च शिक्षक, मुख्याध्यापकांनाच आपल्या खिशातून करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते.
“पुस्तक तालुका स्तरावर पोच झाली आहेत. पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येणार आहे. त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद व उत्साह असतो.” – भगवान फुलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक