ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

सचिन वाझेने एन्काऊंटर किंग शर्माला मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी दिली


 

एनआयएचा खळबळजनक दावा

मुंबई :-उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी स्फोटके भरलेले वाहन उभे करणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने विशेष न्यायालयात महत्त्वाचा खुलासा केला आहे. या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यात 28 फेब्रुवारी 2021 रोजी मलबार हिल येथे गुप्त बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सचिन वाझेंनी शर्मा यांच्याकडे हे काम सोपवले होते, असा खळबळजनक दावा एनआयएने विशेष न्यायालयात केला आहे.

वाझे याने विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. त्याला विरोध करत एनआयएने विशेष न्यायालयात याप्रकरणी आपले म्हणणे सविस्तर मांडले. एनआयएच्या वकिलांनी म्हटले की, अंबानींच्या घराबाहेर वाहन उभे केल्यानंतर दोन दिवसांनी शर्मा आणि वाझे यांची मलबार हिलमध्ये गुप्त बैठक झाली. कॉल डिटेल रेकॉर्डवरून या बैठकीची माहिती उघड झाली आहे. या बैठकीत हिरेन यांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम प्रदीप शर्माला देण्यात आले होते. त्याबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी दोघे वरळी सी फेस येथे देखील गेले होते.

25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरातील अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ उभी केलेली आढळली होती. या गाडीत 20 जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅगही होती. तसेच अंबानी कुटुंबातील सदस्यांना धमकी देणारी चिठ्ठीदेखील सापडली होती. या घटनेने खळबळ उडाली होती. नंतर तपासात ही गाडी ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी मुंब्रा येथील खाडीत सापडला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button