कापूस, सोयाबीनच्या दरामध्ये मंदीने शेतकरी चिंताग्रस्त; कापूस ६७०० तर सोयाबीन…
हिवरखेड: जून महिना सुरू होत असल्यामुळे मॉन्सूनची चाहूल कधीही लागू शकते. पेरणीचे दिवस जवळ आले असूनही कापूस व सोयाबीनच्या दरात मंदी कायम असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे
सन २०२१ च्या खरीप हंगामात कापसाला विक्रमी११ ते१२ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे यंदाही तोच दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, सन २०२२मध्ये कापूस शेतकऱ्यांचा घरात आला, सुरूवातीला प्रतिक्विंटल नऊ हजार ते नऊ हजार ५०० रुपये दर मिळाला. मागील वर्षीप्रमाणे यंदाही कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र मे महिना संपत आला तरीही कापसाचे दर काही वाढले नाही, उलट आता कापूस थेट सहा हजार ७०० पर्यंत खाली घसरला आहे.
कापूस आणि सोयाबीन हे खरिपाचे मुख्य पिके आहेत. गेल्या खरिपात अवेळी झालेल्या पावसाने सोयाबिन, कपाशी आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र निसर्गाच्या या कचाट्यातून शेतकऱ्यांनी कसेबसे पिकं वाचवून घरात आणले. त्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांचा समावेश होता. मात्र यावर्षी सोयाबीन आणि कापस दोन्ही पिकांना समाधानकारक भाव नाही.
मागील हंगामात कापूस घरी आला त्यावेळेस सुरूवातीला भाव मिळणार नाही, काही महिने थांबल्यानंतर भाव मिळतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्याला यंदा अजूनही भाववाढीचा आशेचा किरण दिसला नाही. काही शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता घरात ठेवला. जास्त दिवस कापूस घरात राहिल्यास त्याचा त्रास होतो, कारण कापसाच्या संपर्कात आल्यास अंगाला खाज सुटते. त्यामुळे यंदा ज्यांच्या घरात कापूस भरला आहे. त्यांचा अंगाला खाज सुटली मात्र कापसाचे दर काही वाढले नाहीत.
एकतर भाव नाही, त्यात उत्पादन कमी अशावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे अर्थकारण चालवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान गेल्या खरीप हंगामात पावसाने कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचे अधिक नुकसान झाले आहे. कदाचित त्यामुळेच येत्या खरिपात शेतकऱ्यांकडून कपाशीच्या पेऱ्यात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी 10वी-12वी बोर्डाची परीक्षा होणार की नाही?; शिक्षण मंडळानं दिलं स्पष्टीकरण
खरीप पेरणी तोंडावर, भाव वाढीच्या आशा मावळल्या?
मागील वर्षी खरिपात मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसला. यातच कपाशी व सोयाबीनला समाधानकारक भाव मिळाला नाही. शासकिय हरभरा खरेदीमधून शेतकऱ्यांचा पूर्णपणे हरभरा खरेदी झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी बाजारात प्रतिक्विंटल सातशे ते आठशे रुपये तोटा सहन करावा लागला. अशी स्थिती असतानाच आता खरीप तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीची तयारी करावी लागत आहे. मात्र अजूनही भाव वाढले नाहीत, त्यातल्या त्यात सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्याच्या बातमीने भाववाढीच्या शक्यता मावळल्या असून भाव वाढणार की नाही असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
संपूर्ण हंगाम उलटून गेला तरीही कापूस सोयाबीनच्या दरात वाढ होण्याऐवजी सातत्याने घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे.
-चंद्रप्रकाश माधानी, व्यापारी हिवरखेड.
भाववाढीच्या आशेने पिकलेला संपूर्ण कापूस अनेक महिने घरात साठवून ठेवला परंतु भाव वाढण्याऐवजी कमी झाले आणि कुटुंबातील सदस्यांना खाजेचा सुद्धा त्रास झाला.