ताज्या बातम्या

भारतात नोटा कुठे छापल्या जातात? कागद आणि इतर गोष्टी कुठून आणल्या जातात? वाचा सविस्तर


भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नागरिकांना आता २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून २००० ची नोट चलनात क्वचितच दिसत होती. कारण आरबीआयने २००० च्या नोटांची छपाई फार पूर्वीच थांबवली होती, असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो की, नोटांची छपाई नेमकी कुठे केली जाते आणि ही छपाई कोण करते? याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ.

भारतीय चलन छापण्याचे काम भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक करते. ज्यासाठी देशभरात चार प्रिंटिंग प्रेस आहेत. इथेच नोटा छापल्या जातात आणि भारतीय चलनातील नाणीही चार मिंटमध्ये बनवली जातात.

देशात पहिल्यांदा फक्त इथेच छापल्या जात होत्या नोटा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील नोटा छापण्याच्या उद्देशाने १९२८ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आला होता. ज्यामध्ये १०, १०० आणि १००० च्या नोटा छापण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र त्यानंतरही काही नोटा इंग्लंडमधून आयात करण्यात आल्या होत्या. दरम्यान १९४७ पर्यंत केवळ नाशिक प्रेसच नोटा छापण्याचे काम करत होती. त्यानंतर १९७५ मध्ये मध्य प्रदेशातील देवास येथे देशातील दुसरा प्रिंटिंग प्रेस सुरू झाला आणि १९९७ पर्यंत या दोन प्रिंटिंग प्रेसमधून नोटा छापल्या जाऊ लागल्या.

चार ठिकाणी छापल्या जातात नोटा

१९९७ मध्ये सरकारने अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील कंपन्यांकडून नोटा मागवायला सुरुवात केली. यानंतर १९९९ साली कर्नाटकच्या म्हैसूर येथून आणि पुन्हा २००० साली पश्चिम बंगालमधील सालबोनीमध्ये नोटा छापण्यासाठी प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आला. एकूणच सध्या भारतात नोटा छापण्यासाठी चार प्रिंटिंग प्रेस आहेत.

देवास आणि नाशिक येथील प्रेस वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली काम करतात. तर सालबोनी आणि म्हैसूर येथील प्रेस भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडमार्फत चालवली जाते.

नोटा छापण्यासाठी कागद कुठून येतो?

भारतीय चलनी नोटांसाठी वापरण्यात येणारा बहुतांश कागद जर्मनी, ब्रिटन आणि जपानमधून आयात केला जातो. आरबीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ८० टक्के भारतीय चलनी नोटा परदेशातून येणाऱ्या कागदावर छापल्या जातात. तसेच भारतातील सिक्युरिटी पेपर मिल (होशंगाबाद) ही देखील एक कंपनी आहे जी नोटा आणि स्टॅम्पसाठी कागद बनवण्याचे काम करते. त्याचबरोबर नोटांमध्ये वापरण्यात येणारी खास शाई स्विस कंपनी SICPA कडून घेतली जाते.

शाई बनवण्याचे युनिट भारतात आहे का?

सेंट्रल बँकेची उपकंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण कंपनीचे (BRBNMPL) शाई बनवणारे युनिट ‘वर्निका’ हे कर्नाटकच्या म्हैसूर येथे स्थापन करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश नोटा छापण्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवणे आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button