बीड शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा..
बीड : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची धक्कादायक घडली आहे.
याचवेळी गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. आता ठाकरे गटाकडून अप्पासाहेब जाधव यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची बीड जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
बीड(Beed) शहरातील महाप्रबोधन यात्रेची सभा शनिवारी (दि.२०) होणार आहे. यादरम्यानच ठाकरे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रबोधन यात्रेदरम्यान, पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आल्या होत्या. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी पाठीमागे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीचा ही प्रकार घडला. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
ठाकरे गटा(Thackeray Group)कडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून अप्पासाहेब जाधव यांची बीड जिल्हाप्रमुख पदावरुन तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. याचवेळी सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यातून त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला आहे.
बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे(Sushma Andhare) या कार्यकर्त्यांकडून ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर जाधव यांचा आरोप फेटाळत अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटानं ही स्क्रिप्ट रचल्याची टीका अंधारे यांनी केली आहे.