मान्सूनचा मुहूर्त आला, या दिवशी कोसळणार!
भारतामध्ये पहिला मान्सून केरळमध्ये 31 मे किंवा 1 जूनच्या आसपास दाखल होतो.
यावर्षी मात्र मान्सून केरळमध्ये दाखल व्हायला थोडा उशीर होणार आहे. पुणे हवामान खात्याने याबाबतचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.
मान्सून केरळमध्ये 1 जूनऐवजी आता 4 जूनपर्यंत दाखल होणार आहे. केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल होत असल्यामुळे महाराष्ट्रालाही पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मान्सूनचं प्रमाण यंदा पुर्वानुमानानुसार 96 टक्केच (+/-5%) राहणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
अल निनोचा प्रभाव मान्सूनच्या उत्तरार्धात जाणवणार आहे. मान्सून यंदा काहीसा उशिराने दाखल होत असला तरी पहिला स्पेल समाधानकारक असेल, पम सेकंड स्पेल मात्र कमी प्रमाणात असू शकतो, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनच्या पावसाला व्यवस्थित सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस येईल असा अंदाज आहे. तर मुंबईत मान्सून 14 जूनपर्यंत येऊ शकतो.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केलाय. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलीय.
जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहणार आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव राहणार असून त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात दिसेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
अल निनोच्या धोक्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडेल असा प्राथमिक अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर काळातील मान्सून नेहमीपेक्षा 6 टक्के कमी पडणार असून हे प्रमाण 94 टक्के राहिल असं स्कायमेटनं सांगितलंय.