
बीड : बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना राजकारण्यांकडून मिळणारे अभय यामुळे राज्यात वादंग निर्माण झाला आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फोटो समोर आले आहेत. अत्याचार केल्याचे आणि मारहाण केल्याचे धक्कादायक फोटो समोर आले. यामुळे राज्यभरामधून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्य भाजप नेते व आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच अनेक पुरावे समोर आणून गंभीर आरोप केले होते. आता मात्र भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी देखील तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे
अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करुन व्हिडिओ समोर आणला आहे. त्यांनी पोस्ट करताना लिहिले आहे की, ” हे काय आहे काय? गृहमंत्र्यांनी आणि श्री सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस चा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा अँकर – बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा वीडियो पहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मारहाण करणारा सतीश भोसले हा त्यांचा कार्यकर्ता असल्याचं धस यांनी मान्य केलं आहे. ते याबाबत म्हणाले, “होय! सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ मी पाहिला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यानंतर मला माहिती मिळाली की ही एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती. ती दीड वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
त्यानंतर मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिले आहे.