ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येक कुटुंबाचा इतिहास ठेवणारे गाव


वर्धा:वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात २५ किमी अंतरावर वसलेले भोसा छोटे गाव. गावात अडीचशे कुटुंब असून लोकसंख्या ९५६ एवढी आहे.
खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही आणि तो कसा करावा याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून केले आहे. तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून गावागावांना शाश्वत विकासाचा मंत्र दिला.



जैसे आपण स्नान करावे ॥

तैसे गावंहि स्वच्छ ठेवित जावे ॥

सर्वचि लोकांनी झिजुनी घ्यावे ॥

श्रेय गावाच्या उन्नतीचे ॥

अलीकडे वर्धा जिल्ह्यात काही गावे गावांना गावपण आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात २५ किमी अंतरावर वसलेले भोसा छोटे गाव. गावात अडीचशे कुटुंब असून लोकसंख्या ९५६ एवढी आहे. भोगोलिक क्षेत्र ७२७.७७ हेक्टर एवढे आहे. १९४८ ला गावात ग्रामपंचायतची स्थापना झाली.

दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या असून २०१९ मध्ये थेट सरपंच निवडणुकीमुळे श्रीमती पिंकी प्रवीण अंडस्कार ह्या सर्वसाधारण सरपंच म्हणून निवडून आल्या. त्या गावातील पहिल्या महिला सरपंच. गेल्या पंधरा वर्षात विकासात्मक पायाभूत सुविधा बऱ्यापैकी असून आमदार आदर्श ग्राम योजनेमुळे गावाचा नियोजन आराखडा बनला आहे.

त्यापैकी ४६ कामे गावात झाली आहेत. गावात धार्मिक वातावरण असल्याने व्यसन कमी आहे. गावाची ग्रामपंचायत आयएसओ नामांकित आहे. गावामध्ये उच्च प्राथमिक शाळा, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, सुसज्य व्यायामशाळा, समाजभवन ह्या विकासात्मक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

गावाला २०११ ला पर्यावरणरत्न पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते मिळाला असून तंटामुक्त ग्राम पुरस्कार,निर्मलग्राम संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, असे विविध पुरस्कार मिळाले.

विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतने गावासाठी अभिलेख कक्ष व ग्रामपंचायत विभाग कार्यालय कक्ष ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे. अभिलेख कक्ष संकल्पनेत गावातील प्रत्येक कुटुंबाची एक कुटुंब एक फाइल तयार केली आहे.त्या कुटुंबाची स्थानिक मालमत्ता व वैयक्तिक माहिती संग्रहित केली जाते. तक्रारीची नोंद व दखल घेतली जाते.

ह्या संकल्पनेत प्रत्येक कुटुंबाचा इतिहास जतन होतो. येणाऱ्या अधिकाऱ्याला गावाचे अवलोकन होते. या संदर्भात संदीप बुरीले(संगणक परिचालक) सांगतात की, गावात ज्या व्यक्तीची जागा व मकान आहे त्या व्यक्तीच्या जागेचा ८-अ प्रमाणे स्वतंत्र नंबर फाईलला दिलेला आहे. त्या फाईलमध्ये सर्व मालमत्तेची कागदपत्रे कुटुंबाच्या सहमतीने लावलेली आहेत.

ही फाइल ग्रामपंचायतमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीत उपलब्ध आहे. नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींची मासिक बैठकीत चर्चा होते आणि ती माहिती फाईलमध्ये संग्रहित केली जाते. यामुळे कुटुंबांचा इतिहास व प्रगती जाणून घेण्याला मदत होत असून माहिती सहज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत विभाग कार्यालय कक्ष या संकल्पनेत केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागनिहाय योजनांची माहिती फाईलमध्ये असते.

त्यामुळे आलेले पत्र ,फंड व त्या संबंधाने झालेला पत्रव्यवहार सर्व विभागवार माहिती ठेवली जाते. कोरोनाच्या काळात रिकाम्या वेळेत ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ग्रामपंचायत लेख संहिता २०११ प्रमाणे १ ते ३३ नमुने सुद्धा ऑनलाइन व ऑफलाइन मध्ये उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत १९४८ ला स्थापन झाली तेव्हा पासूनचे कँशबुक आणि मीटिंग प्रोसिडिंग कार्यालयात उपलब्ध आहे. सरकारी प्रकियेप्रमाणे ३४ गटात ते विभागून नबरिंग केले आहे.

गावशेजारून नंदानदी वाहत असल्याने गावाला भोगोलिक जलस्त्रोत प्राप्त आहे. गावामध्ये सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई आणि बजाज फौंडेशनच्या आर्थिक सहकार्याने गावातील जुन्या तीन बंधाऱ्याच्या जलस्रोतांचे पुनर्जीवन केले आहे. पाटबंधारे विभाग व जलयुक्त शिवार योजनेतून माथा ते पायथा काम केल्याने गावात पाण्याची उपलब्धता आहे.

गावालगत ऑक्सिजन पार्क निर्माण करून आंबा, वड, पिंपळ, कवट, चिंच, जांभूळ ही कोरडवाहू फळझाडे लावली आहेत. प्रत्येक महिन्यात आरोग्य कॅंप होते. कोरोना वगळता गेल्या ५ वर्षात कोणताही जलजन्य साथ रोग नसल्याने चंदेरीकार्ड गावाला मिळाले आहे. एक एकरचे खेळाचे मैदान आहे. त्यातील वृक्ष संगोपन शांताराम ठोंबरे हे( माजी खेळाडू ) कोणताही मोबदला न घेता करतात. गावात सिमेंट रोड,पाणी व्यवस्थापन व नाल्याच्या सोयी आहेत. दर आठवड्याला घनकचरा संकलन होते. गावात जुनी इमारत आहे. त्यामध्ये सर्व प्लास्टिक जमा करण्याचा प्रयोग चालू आहे.

देहगाव गोंडी, ता. आर्वी, जि. वर्धा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button