ताज्या बातम्या

पंतप्रधान उद्यापासून राजस्थान आणि गुजरात दौऱ्यावर, PM किसानच्या 14 व्या हप्त्याचं शेतकऱ्यांना होणार वितरण


नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्यापासून म्हणजे 27 आणि 28 जुलैला राजस्थान आणि गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणाऱ्या योजनेअंतर्गत, पंतप्रधानांच्या हस्ते 1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित केली जाणार आहेत.
तसेच राजस्थानमधील सीकर इथे पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 17000 कोटी रुपयांचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.



पंतप्रधान राजस्थानमध्ये पाच नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करणार

युरिया गोल्ड- या सल्फर आवरणयुक्त युरियाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण केलं जाणार आहे. हे उत्पादन कडूनिंबाचे आवरण युक्त युरियाच्या तुलनेत अधिक किफायतशीर आणि प्रभावी ठरणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या उपस्थितीत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) वर 1500 शेतकरी उत्पादक संघटनांना समाविष्ट केले जाणार. राजस्थानच्या आरोग्यविषयक सुविधांना मोठे पाठबळ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये पाच नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करणार आणि सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी करणार आहेत. तसेच राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच 860 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होमार आहे. त्याचबरोर गांधीनगर येथील सेमीकॉन इंडिया 2023 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

कसा असेल पंतप्रधानांचा दौरा

27 जुलैला सकाळी 11:15 वाजता, पंतप्रधान राजस्थानमधील सीकर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास कामांची पायाभरणी करतील. तसेच काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमाराला, गुजरातच्या राजकोटमध्ये पोहोचतील. त्यानंतर राजकोट विमानतळापासून त्यांची रॅली निघणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता पंतप्रधान राजकोटच्या रेसकोर्स मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. 28 जुलैला सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान गांधीनगर येथील महात्मा मंदिर इथं सेमीकॉन इंडिया 2023 चे उद्घाटन करणार आहेत.

सिकरमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम

शेतकऱ्यांना लाभ देणारे महत्वाचे पाऊल म्हणून पंतप्रधान 1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे (PMKSKs) राष्ट्राला समर्पित करतील. शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी एकाच जागी उपाययोजना देण्यासाठी ही केंद्रे विकसित केली जात आहेत. कृषी संबंधित साधने/उपकरणे (खते, बियाणे, अवजारे) यांच्या माहितीपासून ते माती, बियाणे आणि खतांच्या चाचणी सुविधांपर्यंत, विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करुन देत, पीएम किसान समृद्धी केंद्रे ही देशातील शेतकर्यांसाठी एक विश्वासार्ह आधार प्रणाली बनेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय, तालुका/जिल्हा स्तरावरील केंद्रांवर किरकोळ खत विक्रेत्यांची नियमित क्षमता वाढ सुनिश्चित करतील.

PM किसानच्या 14 व्या हप्त्याचे 17,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत होणार

पंतप्रधानांच्या हस्ते 1500 शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ओ एन डी सी) वर लाँच करण्यात येईल. ओ एन डी सी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल विपणन, ऑनलाईन देयके, व्यवसाय ते व्यवसाय (B2B) आणि व्यवसाय ते ग्राहक व्यवहार करता येतील. त्यामुळं स्थानिक मूल्य वर्धनासह ग्रामीण भागातील दळणवळणाच्या वाढीला चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) अंतर्गत 14 व्या हप्त्याची रक्कम 8.5 कोटी हून अधिक लाभार्थ्यांना 17,000 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जारी केले जातील.

राजस्थानमध्ये आरोग्यविषयक पायाभूत सेवासुविधांचा मोठा विस्तार होणार

पंतप्रधान या दौऱ्यात चित्तौडगड, ढोलपूर, सिरोही, सीकर आणि श्री गंगानागर येथे पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उदघाटन करणार आहेत. बारन, बुंदी, करौली, झुंझुनू, सवाई माधोपूर, जैसलमेर आणि टोंक येथे सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी करणार आहेत. याद्वारे राजस्थानमध्ये आरोग्यविषयक पायाभूत सेवासुविधांचा मोठा विस्तार होणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ‘विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयांसह संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी’ केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ही वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असलेली पाच वैद्यकीय महाविद्यालये 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आली आहेत. तर ज्या सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केली जाईल त्यासाठी 2,275 कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते उदयपूर, बांसवाडा, प्रतापगड आणि डुंगरपुर या जिल्ह्यांतील सहा एकलव्य मॉडेल निवासी शाळांचे उद्घाटन होणार आहे . संबंधित जिल्ह्यांत राहणाऱ्या आदिवासी जनतेला या शाळांचा लाभ मिळेल. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान जोधपुर येथील तिवरी गावातील केंद्रीय विद्यालयाचे देखील उद्घाटन करतील.

पंतप्रधानांचा राजकोट दौरा

राजकोट येथे विकसित करण्यात आलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशभरात हवाई वाहतुकीद्वारे संपर्क वाढवण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेला मोठी चालना मिळणार आहे. अडीच हजार एकराहून अधिक क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या या ग्रीनफिल्ड प्रकारच्या विमानतळाच्या उभारणीसाठी 1400 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. या नव्या विमानतळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत घटक यांचा मिलाफ करण्यात आला आहे. येथील टर्मिनल इमारत ग्रीह-4 (एकात्मिक निवास मूल्यमापनासाठी हरित मानांकन),मधील नियमांचे पालन करून तयार केली आहे तसेच नवी टर्मिनल इमारत (एनआयटीबी) दुहेरी इन्सुलेटेड छत यंत्रणा, स्कायलाईट्स, एलईडी प्रकाशयोजना, कमी उष्णता शोषणारे ग्लेझिंग यांसारख्या विविध शाश्वत घटकांसह सुसज्जित आहे. राजकोट येथे उभारण्यात आलेले हे नवे विमानतळ स्थानिक वाहन उद्योगाच्या विकासात योगदान तर देईलच त्याचबरोबर, संपूर्ण गुजरातमध्ये व्यापार,पर्यटन,शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्राला देखील चालना देईल.

पंतप्रधान या भेटीत 860 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन सुद्धा करणार आहेत. सौनी योजना लिंक 3 पॅकेज 8 आणि 9 मुळे सौराष्ट्र भागातील सिंचन सुविधेला बळकटी आणण्यास मदत होईल. तसेच तेथील लोकांना पेयजल सुविधेचा देखील लाभ मिळेल. द्वारका RWSS योजनेच्या अद्ययावतीकरणामुळे गावांना पाईपलाईनद्वारे पुरेशा प्रमाणात पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल. या वेळी अपरकोट किल्ल्याचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि विकास कार्य टप्पा 1 व 2 ; जल प्रक्रिया संयंत्राची उभारणी, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, उड्डाणपूल इत्यादी इतर प्रकल्प देखील हाती घेण्यात येत आहेत.

पंतप्रधानांची गांधीनगरला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 जुलै रोजी गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे सेमीकॉन इंडिया 2023 या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ‘भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला प्रेरणा देताना’ ही या परिषदेची संकल्पना आहे. या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख उद्योजक, शिक्षण संस्था आणि संशोधन संस्था यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित केली आहे. सेमीकंडक्टरची रचना, निर्मिती तसेच तंत्रज्ञान विकास यांच्या क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवरील मुख्य केंद्र म्हणून घडवण्याच्या दृष्टीने तयार केलेली भारताची सेमीकंडक्टर नीती आणि धोरण यांची माहिती या परिषदेत सादर होईल. सेमीकॉन इंडिया 2023 या परिषदेमध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजी, अप्लाईड मटेरियल्स, फॉक्सकॉन,एसईएमआय,कॅडेन्स, एएमडी यांच्यासह इतर अनेक प्रख्यात कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button