ग्रामपंचायत नोंदीसाठी दहा हजारांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात
पुणे : पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यात (जि.पुणे) महसूल विभागात लाचखोरी वाढत चालल्याचे `एसीबी`च्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आज मावळात लाचेचा आणखी एक यशस्वी `ट्रॅप` झाला.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
एका पत्र्याच्या शेडची ग्रामपंचायतीत नोंद करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे, कामशेतचे ग्रामविकास अधिकारी विलास तुकाराम काळे (वय ४६) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.
खडकाळे ग्रामपंचायत कार्यालयातच ही लाच काळेने घेतली. चार महिन्यांपूर्वी मावळातील शिवणेच्या मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४) यांना आढले बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.
खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी त्यांनी ही लाच स्वीकारली होती. मावळातील या दोन्ही लाचेच्या घटनांत एक साम्य आहे. या दोन्ही प्रकारांत लाचखोर महसूल अधिकाऱ्याने लाच ही सरकारी कार्यालयातच घेण्याचे धाडस केलेले आहे.
त्यानंतर गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील निविदा लिपिक दिलीप भावसिंग आडे हा एक लाख रुपयांची स्वीकारताना पकडला गेला. त्याच्या विभागाच्या एका ठेकेदाराकडूनच त्याने ही लाच घेतली. या कंत्राटदाराला मंजूर झालेल्या निविदेची वर्क ऑर्डर तयार करून सबंधित विभागाकडे पाठविण्यासाठी त्याने हे पैसे लाच म्हणून घेतले होते.
आजच्या लाचेच्या घटनेतील एसीबीच्या तक्रारदाराने आपल्या आईच्या नावे खडकाळे ग्रामपंचायत हद्दीत खरेदी केलेल्या जागेवर एक पत्र्याचे शेड बांधले होते. त्याची नोंद ग्रामपंचायतीत ८अ उताऱ्यावर करण्यासाठी काळे याने बारा हजार रुपये त्यांच्याकडे मागितले होते. नंतर दहा हजारावर त्याने तडजोड केली. ती घेताना आज तो पकडला गेला.
एसीबीच्या पुणे परिक्षेत्राचे (रेंज) एसपी तथा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. एसीबीचे पीआय श्रीराम शिंदे पुढील तपास करीत आहेत.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !