जन्मदात्या आईनेच चाकू खुपसून आपल्या चार वर्षीय मुलीची केली हत्या

पुणे : (आशोक कुंभार )पुण्यातील हडपसर भागात धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय ४) असे या चिमुरडीच नाव आहे. जन्मदात्या आईनेच चाकू खुपसून आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या संबंधी या लहान मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र नेमकं तिने ही हत्या कुठल्या उद्देशाने केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती यासाठी घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता.
शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान, घरमालक व शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चिमुरडीचा खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.