बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही – राज ठाकरे
मुंबई : ( आशोक कुंभार ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुबंई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी मनसैनिकांना संबोधित केलं.
या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतचा एक प्रसंग सांगितला आहे.
राज ठाकरे म्हणाले, ”मला शिवसेनेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत होता हे मला कळत होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो आणि म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यानंतर आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो.
मी उद्धव ठाकरेंना समोर बसवलं. मी हे सर्व शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगत आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारलं तुला काय हवंय? तुला पक्षप्रमुख व्हायचंय, हो. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय हो. पण फक्त माझं काम काय मला सांग”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
”माझ्या मनात पक्ष काढण्याचं नव्हत. पण अनेक लोक माझ्याकडे यायला लागले. त्यानंतर मी पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक गोष्टी झाल्या, घरातूनही राजकारणातून झालं. आता उद्धव ठाकरे हे लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत फिरत आहेत. पण हे सांगण्याआधी जर तुम्ही काय राजकारण केलं हे सांगा”, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
”एकनाथ शिंदे हे सुरतला गेले. सध्या शिवसेनेचं काय झालं? हे महाराष्ट्र पाहत आहे, पण हे बाळासाहेब ठाकरे असते तर हे घडलं नसतं. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही. एकाला झेपलं नाही आणि दुसऱ्या झेपेल की नाही माहित नाही”, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना नाव न घेता लगावला.