ईडीची बनावट नोटीस बनवणाऱ्यास काशीमिरा पोलिसांनी दिल्लीवरून केली अटक
मीरारोड : (आशोक कुंभार )मीरा भाईंदर मधील बड्या विकासक व भागीदारांना ईडीची बनावट नोटीस दाखवून ६ कोटी ५५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी काशीमिरा पोलिसांनी दिल्लीवरून ईडीची बनावट नोटीस बनवणाऱ्यास अटक केली आहे. शहरातील विकासक आनंद अग्रवाल, हरीश उर्फ मोंटू अग्रवाल व जॉर्डन परेरा ह्या तिघा भागीदारांना ईडीची बनावट नोटीस दाखवून ६ कोटी ५५ लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी काशीमिरा पोलिस ठाण्यात गौतम अग्रवाल , मितेश शाह व राजू शाह विरुद्ध खंडणीचा गुन्हा १० मार्च रोजी दाखल झाला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर तिन्ही आरोपींना नोटीस बजावली असता मितेश हा हजर झाला. मात्र गौतम आणि राजू अजूनही पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे सह सचिन हुले , राहुल सोनकांबळे यांच्या पथकास ईडीची बनावट नोटीस दिल्ली येथील कृष्णकुमार ओमप्रकाश कौशिक रा . स्वामी दयानंद कॉलनी , पदम नगर याने बनवली असल्याचे समजले. कौशिक हा त्याचे वास्तव्य सतत बदलत होता. पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि दिल्ली येथे प्रत्यक्ष शोध घेत कौशिक ह्याला १६ मार्च रोजी दिल्लीवरून अटक केली. त्याला शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता २१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदींची बनावट नोटीस कौशिक याने बनवली होती. त्याने ईडीचा शिक्का सुद्धा बनावट तयार करून घेतला होता. विकासकांना खंडणीसाठी घाबरवण्या करता आदींची नोटीस बनवून देण्यासाठी कौशिक याने पैसे घेतले . गौतम व मितेश हे दोघे कौशिकला दिल्ली येथे जाऊन भेटले होते. कौशिक हा त्याच्या मेलबर्न येथील भावाचे दिल्ली वरून लेखापाल म्हणून काम करतो. त्याने बनावट नोटीस बनवून देण्यासाठी नेमके किती पैसे घेतले व त्यात कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान गौतम व राजू हे दोघे पोलिसांनी नोटीस देऊन सुद्धा हजर झाले नसून दुसरीकडे ते दोघेही पोलिसां अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.